संचारबंदीच्या काळात ग्रामसेवकाने घेतली मासिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:14+5:302021-04-25T04:18:14+5:30
निहिदा : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सकाळी अकरा वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव दिसल्यास दंडात्मक ...
निहिदा : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सकाळी अकरा वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव दिसल्यास दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्याचा आदेश असतानाही पिंजर येथील ग्रामसेवकाने १७ सदस्यांची मासिक सभा एकाच सभागृहात घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मासिक सभेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान, काही महत्त्वाचे असल्यास स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये ऑनलाईन सभा आयोजित करतात. मात्र, पिंजर येथील ग्रामसेवकाने ऑनलाईन सभा आयोजित न करता बेफिकीरपणे दि. २२ एप्रिल रोजी एका सभागृहात मासिक सभेचे आयोजन केले. या सभेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची माहिती आहे. कोरोनाच्या संकट काळात मासिक सभेचे आयोजन का केले, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
मी ग्रामसेवकास सभेचे आयोजन करू नका असे सांगितले होते. तरीही सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत कोणीही मास्क लावले नव्हते, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. ग्रामसेवकाने सभेचे आयोजन नियमबाह्य केले. त्यामुळे मासिक सभेचे दुसऱ्यांदा आयोजन करावे.
-अशोकराव लोनाग्रे, उपसरपंच ग्रा. पं. पिंजर.
---------------------------------------------------- --
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना ग्रामसेवकाने मासिक सभा घ्यायला नको होती. त्यांनी मासिक सभेचे आयोजन कसे केले, याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- किशोर काळबांडे, बीडीओ बार्शीटाकळी.
-------------------------
बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही. त्यामुळे ऑनलाईन सभा घेऊ शकलो नाही. जी मासिक सभा आयोजित केली होती, त्यामध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.
-आर. पी. थोरात, ग्रामसेवक, पिंजर.