ग्रामसेवक चार महिन्यांपासून गायब; ग्रा.पं. सदस्यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:49+5:302021-05-29T04:15:49+5:30
अकोट : कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर निधी व सूचना देण्यात येत आहेत, पंरतु कोरोनाच्या संकटातही ...
अकोट : कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर निधी व सूचना देण्यात येत आहेत, पंरतु कोरोनाच्या संकटातही जऊळका ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विनायक वायाळ चार महिन्यांपासून गायब असल्याची तक्रार ग्रा. पं. सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्रामसेवकांची बदली करून कर्तव्यदक्ष ग्रामसेवक गावाला देण्याची मागणी ग्रा. पं. सदस्यांनी तक्रारीतून केली आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यास ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तक्रारीतून दिला आहे.
जऊळका येथील ग्रा. पं. सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकोट तालुक्यातील जऊळका ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विनायक वायाळ यांनी चार महिन्यांपासून फक्त तीन वेळ ग्रामपंचायतीला धावती भेट दिली आहे. ग्रामस्थांच्या आरोग्यकरिता आलेला १४व्या वित्त आयोगाचा निधी अद्यापही खर्च केला नाही. कोरोना संसर्ग वाढत असतानाही समाजोपयोगी उपक्रम ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे राबवता येत नाहीत. ग्रामस्थांच्या वतीने गावात कोरोना सेंटर उघडायचे होते, पण ग्रामसेवकाचे सहकार्य नसल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्यांनी केला आहे. याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करीत नसल्याची तक्रार उपसरपंच दीपक शेटे, संजय इंगळे, छाया प्रवीण अंभोरे, सुप्रिया नीलेश धांडे, सुशीला जगदेव अवचार, सुजित पुरुषोत्तम तांदळे व प्रकाश घनबहादूर, वसंतराव शेटे, प्रफुल्ल काठोळे, अरुण सोनटक्के, जगदेवराव अवचार, मनोहर भारसाकळे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली आहे.