दोन अधिका-यांसह ग्रामसेवक निलंबित!
By admin | Published: April 14, 2016 02:10 AM2016-04-14T02:10:51+5:302016-04-14T02:10:51+5:30
रोहयोच्या रस्ते कामात भ्रष्टाचार; रणधीर सावरकर यांच्या प्रश्नावर जलसंपदा राज्यमंत्र्यांची घोषणा.
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बोरगावमंजू येथील रस्ते कामातील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.आर. रणबावरे, सहायक लेखाधिकारी गणेश कहार या दोन अधिकार्यांसह ग्रामसेवक संदीप गवई यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत केली. रोहयो अंतर्गत बोरगावमंजू येथील शेतरस्त्यांच्या कामात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबतचा तारांकित प्रश्न आ. रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला. सुमारे ७0 लाख रुपयांच्या शेतरस्त्याच्या कामात ४६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला असतानाही यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बोरगावमंजू येथील ३.५0 कोटी रुपयांच्या नऊ रस्त्यांची कामे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली. त्यापैकी सहा रस्ते कामांची चौकशी करण्यात आली. तीन रस्त्यांच्या कामांचे मोजमाप पुस्तिकेसारखे महत्त्वाचे दस्तावेज गहाळ करण्यात आल्याने चौकशी करता आली नसून, यासंबंधीचे रेकॉर्ड अद्यापही गहाळ आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यामार्फत या सर्व बाबींची चौकशी करण्यात आली असून, जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्यात आला होता.