मराठा सेवा संघाची भव्य शोभायात्रा
By admin | Published: December 25, 2015 03:14 AM2015-12-25T03:14:28+5:302015-12-25T03:14:28+5:30
अजित पवार यांनी दाखवली हिरवी झेंडी.
अकोला: मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनानिमित्त अकोला क्रिकेट क्लब मैदानावर २४ ते २६ डिसेंबरदरम्यान वैचारिक दालनाच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीवर प्रकाशझोत टाकला जाणार असून, गुरुवारी यानिमित्त शोभायात्राही काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखवली. मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय अधिवेशनाला गुरुवारी शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली. रामदासपेठ येथील होमगार्ड ग्राउंडवर मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मिरवणुकीत जिल्ह्याच्या विविध भागातून सहभागी झालेले महिला भजनी मंडळ, माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेला अश्वरथ, तसेच बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, ठाणे यांसह हरियाणा येथून दाखल झालेल्या शिवप्रेमींना दुर्गा चौकामध्ये शिस्तीत उभे करण्यात आले. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखविली. तत्पूर्वी अजित पवार यांचे माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, राकाँ जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अजय तापडिया, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, रवींद्र सपकाळ, मार्तंडराव माळी, देवानंद ताले आदींसह असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.