नातवाच्या सुटकेसाठी जादूटोणा करणारी आजी कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:51 PM2019-10-19T12:51:54+5:302019-10-19T12:51:58+5:30
नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या दरवाजात सुगंधी मोहरी व पाणी शिंपडून मंत्र पुटपुटले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विनयभंग प्रकरणात आरोपी नातवाच्या सुटकेसाठी त्याच्या आजीने जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या दारात सुगंधी मोहरी व पाणी शिंपडून मंत्र म्हणत जादूटोणा केल्याचा प्रकार ११ आॅक्टोबर रोजी घडला होता. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आजीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिला शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची रवानगी कारागृहात केली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपी समीर शाह सलीम शाह याच्याविरुद्ध मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तो कारागृहात असल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करावा, यासाठी त्याच्या नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेतली.
शुक्रवारी त्याची आजी जरीनाबी नरसुल्ला शाह (४८ रा. अकोट फैल) हिने नातवाच्या सुटकेसाठी न्यायालयाच्या दरवाजात सुगंधी मोहरी व पाणी शिंपडून मंत्र पुटपुटले होते. या प्रकरणात प्रभारी अधीक्षक दिनेश अलकरी यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार दाखल केला होता. या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)