आजीच्या दातृत्वामुळे भागली ग्रामस्थांची तहान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:29+5:302021-05-26T04:19:29+5:30
(फोटो पासपोर्ट आहे.) रवी दामोदर अकोला : तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येणारे लोणाग्रा हे गेल्या ३० वर्षांपासून पाणीटंचाईसाठी चर्चेत असणारे गाव. ...
(फोटो पासपोर्ट आहे.)
रवी दामोदर
अकोला : तालुक्यातील खारपाणपट्ट्यात येणारे लोणाग्रा हे गेल्या ३० वर्षांपासून पाणीटंचाईसाठी चर्चेत असणारे गाव. गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे पाणीटंचाईची समस्या बिकट झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी पाटील कुटुंबातील ९२ वर्षांच्या आजी शुद्धमतीबाई पाटील या पुढे आल्या. त्यांनी लोणाग्रावासीयांची तहान भागविण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाला स्वत:च्या मालकीची जागा दान देऊन दातृत्वाचा एक आदर्श गावासमोर ठेवला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने दान मिळालेल्या जागेत बोअरवेल खोदले. या बोअरवेलला भरपूर प्रमाणात पाणी लागले असून, आजरोजी या बोअरवेलमधूनच संपूर्ण गावाची तहान भागविली जात आहे.
अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावात पिण्याची पाण्याची समस्या गंभीर असल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी काही किमी अंतरावर भटकंती करावी लागते. गावाला कारंजा-रमजानपूर प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र हा पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होते. दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ग्रामस्थांचे होणारे हाल लक्षात घेऊन गावातील ९२ वर्षीय शुद्धमतीबाई पाटील या आजीने पुढाकार घेत स्वत:च्या शेतातील जागा ग्रामपंचायतीला दान दिली. ग्रा.पं. प्रशासनाने या जागेत बोअरवेल खोदली. बोअरवेलला भरपूर पाणी लागली असून, सध्या याच बोअरवेलमधून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.
----------------
ग्रामस्थ कृतज्ञ, दरवर्षी आजीचा साजरा होतो वाढदिवस
९२ वर्षीय शुद्धमतीबाई पाटील यांनी ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेत गावाची तहान भागविण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा दान दिली. आजीच्या दातृत्वाची ग्रामस्थांना जाण असून, गावातील युवक पुढाकार घेऊन दरवर्षी आजीचा वाढदिवस साजरा करतात.
----------------------------------
गावातील गोड्या पाण्याची समस्या ‘जैसे थे’!
लोणाग्रा हे गाव खारपाणपट्ट्यात असल्याने गावात गोड्या पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन गोडे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
---------------------------
गावातील शुद्धमतीबाई पाटील यांनी ग्रा.पं. प्रशासनाला बोअरवेल खोदण्यासाठी स्वत:ची जागा दान दिली. याच जागेत खोदलेल्या बोअरवेलमधून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केल्या जात आहे.
-रंजना दळवी, ग्रामसेवक, लोणाग्रा
----------------------------
शुद्धमतीबाई पाटील यांच्या दातृत्वाची सर्वांना जाण असून, आम्ही सर्व युवक एकत्र येत दरवर्षी आजीचा वाढदिवस साजरा करतो.
-सुबोध गवई, ग्रामस्थ, लोणाग्रा
---------------------------