नातवाच्या सुटकेसाठी आजीचा न्यायालयाच्या दरवाजातच जादूटोणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 15:41 IST2019-10-16T15:40:59+5:302019-10-16T15:41:08+5:30

रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Grandmother's witchcraft at the court door to relieve her grandson | नातवाच्या सुटकेसाठी आजीचा न्यायालयाच्या दरवाजातच जादूटोणा

नातवाच्या सुटकेसाठी आजीचा न्यायालयाच्या दरवाजातच जादूटोणा

अकोला - मूर्तिजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनयभंग तसेच पोक्सो कायद्यात आरोपी असलेल्या एका युवकाच्या सुटकेसाठी त्याच्या आजीने प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाच्या दरवाजाजवळ सुगंधीत मोहरी टाकून मंत्र मंतरले आणि त्यानंतर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडल्यानंतर या प्रकरणाचा तपास करून रामदास पेठ पोलिसांनी मंगळवारी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूर्तिजापूर येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या समीर शाह सलीम शाह या युवकाविरुद्ध मूर्तिजापूर पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या आरोपीस अटक केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाच्या आदेशान्वये आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर कारागृहात असलेल्या आरोपीची जमानत घेण्यासाठी त्याच्या नातेवाइकांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र गत अनेक दिवसांपासून जामीन मिळत नसल्याने या आरोपीच्या कुटुंबातील त्याची आजी आणि आणखी एक अशा दोन बुरखाधारी महिला शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात आल्या. या दोन महिलांमधील जरीनाबी नरसुल्ला शाह (४८) रा. अकोट फैल या महिलेने तिच्या नातवाच्या सुटकेसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रथम यांच्या न्यायालयाच्या कक्षासमोरच सुगंधीत पिवळसर आणि पांढरी मोहरी टाकून जोरात मंत्र मंतरले. हा प्रकार न्यायालयात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी न्यायाधीशांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे हे आचरण अनिष्ठ व अघोरी असल्याने आणि यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने या संदर्भात महिलेला विचारणा केली असता, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाचे प्रभारी अधीक्षक दिनेश जनार्दन अलकरी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून जरीनाबी शाह या महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंध व अघोरी प्रथा उच्चारण अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत.
 
देशातील पहिली घटना
न्यायदेवतेच्या आवारात नातवाच्या किंवा कोणत्याही आरोपीच्या सुटकेसाठी सुगंधीत मोहरी टाकून मंत्र मंतरने तसेच जादूटोणा केल्याची ही देशातील पहिली घटना असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. यावरून आजही जादूटोणासारखे अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव आहे.

 

Web Title: Grandmother's witchcraft at the court door to relieve her grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.