चारा उत्पादक शेतक-यांना मिळणार अनुदान
By Admin | Published: October 7, 2015 10:49 PM2015-10-07T22:49:14+5:302015-10-07T22:49:14+5:30
हायड्रोपोनिक युनिटला मंजुरात दिली असून चारा त्वरित मिळण्यासाठी १६ हजार ६६६ युनिटचे लक्ष्यांक.
बुलडाणा : चारा टंचाईवर मात करण्यसाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण विकास कार्यक्रम जलदगतीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शेतकर्यांना ६ हजार रूपये प्रति युनिट अनुदान देण्यात येणार आहे. चारा त्वरित मिळावा यासाठी हायड्रोपोनिक युनिटचे १६ हजार ६६६ लक्ष्यांक देण्याचा निर्णय शासनाने ६ ऑक्टोबर रोजी घेतला आहे. राज्यातील पर्जन्यमानाची असमाधानकारक परिस्थिती विचारात घेऊन चारा टंचाई परिस्थितीवर मात करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास २५ कोटी रूपये निधीच्या तरतूदीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय १४ सप्टेंबर २0१५ अन्वये गतिमान वैरण विकास कार्यक्रम राबविण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सदर कार्यक्रमाची प्रगती अपेक्षित गतीने चालू नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदर कार्यक्रमाच्या तातडीने अंमलबजावणीबाबत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात वैरण विकास कार्यक्रम जलदगतीने राबवावे, बियाण्यांची उचल लवकर करावी, उचल केलेल्या बियाण्यांची लागवड होणे आवश्यक आहे, याबाबतची खात्री संबधीत कृषी अधिकार्यांनी करावी, लागवड केलेल्या चारा पिकाची उगवण झाल्यानंतरच फोटो संबंधित कृषी सहाय्यकांनी काढावेत, सदर कार्यक्रमांतर्गत स्थानिक गरजा विचारात घेवून आवश्यकतेनुसार हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाव्दारे चारा लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा तसेच प्रगती अहवाल विभागीय सहसंचालक कृषी यांचेकडून दर पंधरा दिवसांनी प्राप्त करून घेवून शासनास सादर करावा, आदी सूचनांचा समावेश आहे.
हायड्रोपोनिक युनिट म्हणजे काय ?
चारा तयार करण्यासाठी मका, गहू यांचा वापर प्राधान्याने करण्यात येतो. या धान्यांना सोडियम हायपोक्लोराइड किंवा ई. एम. च्या द्रावणात बीज प्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धान्य १२ तास भिजत ठेवून २४ तास अंधार्या खोलीत ठेवले जाते. त्यानंतर ट्रेमध्ये पसरवले जाते. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोगर सिस्टिमद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. एकूण २00 लीटर पाणी दिवसभरात वापरले जाते. ही सर्व यंत्रणा स्वयंचलीत करण्यात आली आहे. या पद्धतीद्वारे आठ दिवसांत चारा उपलब्ध होतो. या यंत्रणेत ट्रेचा वापर केल्याने मातीशिवाय चारा उत्पादन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली आहे. फक्त पाण्यावरच या चार्याची सात ते आठ दिवसांत २0 ते २५ सेंमी उंचीपयर्ंत वाढ होते. एका ट्रेमधील पावणेदोन किलो गव्हाच्या धान्यापासून १४ ते १६ किलो लुसलुशीत चारा जनावरांना खाण्यासाठी तयार होत आहे. एक किलो चारा तयार करण्यासाठी सर्वसाधारण अडीच ते तीन रुपये खर्च येतो. असा चार तयार करणार्या युनिटला हायड्रोपोनिक युनिट असे म्हणतात.