अनुदान मिळाले, आता मोफत पाठय़पुस्तकांची मागणी
By admin | Published: June 22, 2015 02:19 AM2015-06-22T02:19:34+5:302015-06-22T02:19:34+5:30
२४ विनाअनुदानित शाळा १५ वर्षांनंतर शासन अनुदानास पात्र.
अकोला : जिल्ह्यातील २४ विनाअनुदानित शाळांना १५ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने अनुदानास पात्र घोषित केले आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या या शाळांना आता मोफत पाठय़पुस्तकांची सेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली. विनाअनुदानित पात्र शाळांना अनुदान मिळावे, यासाठी १५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. वारंवार आंदोलनं करण्यात आली, तसेच लोक प्रतिनिधींना निवेदनेदेखील देण्यात आली. समितीच्या अथक प्रयत्नानंतर राज्यातील अनुदानास पात्र शाळांची यादी घोषित करण्यात आली होती. परंतु, अमरावती विभागातील शाळांना या यादीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे १२ मे रोजी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अनुदानासाठी पात्र विनाअनुदानित शाळांची यादी जाहीर केली. या यादीत जिल्ह्यातील २४ माध्यमिक शाळांचा समावेश करण्यात आला आहे. अनुदान मिळालेल्या या शाळांना नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी मोफत पाठय़पुस्तके आणि शालेय पोषण आहार देण्याची तरतूद करावी, अशी मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने करण्यात येत आहे. या संदर्भात कृती समितीच्यावतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक सोनोने यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. अनुदानास पात्र शाळांना या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी शिक्षणाधिकारी यांनी कृती समितीच्या पदाधिकार्यांना दिले.