डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 02:35 PM2019-08-24T14:35:59+5:302019-08-24T14:36:05+5:30
गााजर गवत निर्मूलन जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला : गाजर गवताविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने गााजर गवत निर्मूलन जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
जबलपूर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तण संशोधन संस्थेच्या निर्देशानुसार दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, कृषी विद्या विभागातर्फे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते २२ आॅगस्टपर्यंत गाजर गवत निर्मूलन सप्ताह पाळण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठातील विविध महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे व विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी गाजर गवताच्या निर्मूलनाविषयीची जनजागृती केली. समारोप कार्यक्रमानिमित्त एका भव्य रँलीद्वारे गाजर गवत निर्मूलनाची जनजागृती करण्यात आली. वसतिगृहाच्या सभोवतालचे गाजर गवत निर्मूलन करण्यात आले. कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील गाजर गवतावर उपजीविका करून नष्ट करणारे मेक्सिकन भुंगे सोडण्यात आले. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे डॉ. ययाती तायडे, डॉ. नरसिंग पार्लावर, डॉ. आदिनाथ पसलावर, प्रा. डॉ. सुधीर वडतकर, डॉ. अनिल तुरखडे, डॉ. अरविंद तुपे, डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. गणेश भगत, प्रा. वीरेंद्र ठाकूर, डॉ. सीमा नेमाडे, प्रा. दिलीप धुळे, डॉ. मिलिंद गिरी व विद्यापीठातील इतर प्राध्यापक व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाजर गवत निर्मूलन सप्ताह यशस्वी करण्यासाठी तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. जयंत देशमुख व डॉ. संजय काकडे, डॉ. राजाभाऊ कुबडे, डॉ. ए. पी. करुणाकर, डॉ. योगेश चर्जन, डॉ. मनीष देशमुख, परीक्षित शिंगरूप, नीलेश मोहोड, वामन मोरे, प्रदीप ठाकरे, मंगेश सोळंके, स्वप्निल ठाकरे, प्रीतम चिरडे, सुमेध हिवाळे व इतर पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी तसेच कृषी विद्या प्रक्षेत्रावरील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.