ग्रासरूट इनोव्हेटर : सायकलवर चालणाऱ्या डवरणी यंत्राने तण व्यवस्थापन करणे झाले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:34 PM2018-12-28T12:34:31+5:302018-12-28T12:34:41+5:30
हे यंत्र घरी तयार करता येत असल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढला आहे.
- राजरत्न सिरसाट ( अकोला)
तणाचे व्यवस्थापन करणे आता सोपे झाले असून, अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी व अवजारे विभागाने हाताने चालविण्यात येणारे सायकल डवरणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना घरी तयार करता येत असल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढला आहे.
अत्यल्प, अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बैल जोडी किंवा बैलगाडी ही साधणे सहसा नाहीत, पिकातील तण व्यवस्थापन करायचे असेल तर ९९ टक्के शेतकऱ्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. पिकातील दोन ओळीतील तण काढण्यासाठी जर वेळेवर डवरणी झाली नाही, तर मात्र तणाची वाढ होऊन पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण वाढते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या सायकल डवरणी यंत्राचा चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे सायकल डवरणी यंत्राच्या देखभालीची गरज नाही. त्याची पास बोथट झाली तरच त्याला धार लावावी लागते. पिकाच्या दोन ओळीतील डवरणी करताना सायकल यंत्राचा त्रास होत नाही, कारण याचे पुढचे चाक मोठे असून, सर्व भार त्या चाकावर येत असल्याने शक्ती कमी लागते. एका तासाला १० गुंठे क्षेत्रातील तण व्यवस्थापन करता येते. सायकल चालविण्यासाठी एकाच मजुराची गरज लागते. सायकल डवरा बनविण्यासाठीचा खर्च केवळ ८५० रुपये आहे.
हा डवरा शेतकऱ्यांदेखील तयार करता येतो. म्हणजे डवरा तयार करण्यासाठी इंजिनिअर किंवा कंपनीची गरज नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. एस.एच. ठाकरे यांनी सायकल डवरा विकसित केला. हा डवरा बघून अनेक शेतकऱ्यांनीदेखील हे यंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. पिकातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता बैलजोडीची गरज नाही, अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा सायकल डवरा वरदानच ठरत आहे.