ग्रासरूट इनोव्हेटर : ...आता हळद काढणीचे अवघड काम झाले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:16 PM2018-12-04T12:16:48+5:302018-12-04T12:17:04+5:30
हळद काढणीचे अवघड काम सोपे करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंत्र विकसित केले आहे.
- राजरत्न शिरसाट (अकोला)
हळद काढणीचे काम अत्यंत अवघड असते. शेतकऱ्यांना यासाठी मोठ्या प्रमाणात श्रम घ्यावे लागते तसेच यात वेळही खूप जातो. हे अवघड काम सोपे करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद काढणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला जॉइंट अॅग्रोस्कोची मान्यता प्राप्त झाली असून, आता हे यंत्र विद्यापीठाकडे उपलब्ध झाले आहे.जॉइंट अॅग्रोस्कोत मान्यता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश अधिक होता.
राज्यात सांगली, सातारा, मराठवाडा व विदर्भात हळदीचे पीक घेतले जाते. दोन-तीन वर्षांपूर्वी राज्यात १.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्यात आली होती. दरवर्षी हे क्षेत्र वाढतच आहे. याचाच विचार करू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी अभियांत्रिकी कृषी शक्ती व अवजारे विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक खांबलकर व डॉ. धीरज कराळे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हळद फायदेशीर पीक आहे. तथापि, काढणीसाठी एकूण पीक उत्पादनाच्या खर्चात जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खर्च येतो. पिकाच्या काढणीसाठी हळद पिकाची काढणी मजुरांच्या साहाय्याने केली तर यासाठी आठपट मजूर जास्त लागतात.
या पिकाची व्यावसायिक उपयोगिता व वेळेची बचत बघता हळद काढणी यंत्र प्रभावी ठरले असल्यामुळे या यंत्राला राज्यस्तरीय जॉइंट अॅग्रोस्कोमध्ये मान्यता प्राप्त झाली आहे. ट्रॅक्टरवर चालणाऱ्या या यंत्राचा जमिनीतून हळद काढण्याचा खर्च प्रतितास केवळ २३५ रुपये आहे. यंत्राच्या वापरामुळे हळकंद काढण्याच्या खर्चात पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ३३.२१ टक्के बचत होते. हे यंत्र केवळ अडीच हजार रुपयांचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.