'इको फ्रेन्डली ' होळीसाठी हरित सेनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 02:01 PM2020-03-02T14:01:51+5:302020-03-02T14:02:58+5:30
पाणी बचत आणि नैसर्गिक रंगाचा वापर यावर भर देण्यात येणार आहे.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : होळीचा सण जवळ आला असून इको फ्रेन्डली होळीसाठी हरित सेनेने पुढाकार घेतला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २३५ शाळांमधील हरित सेनेकडून राज्यभर जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. सोबतच पाणी बचत आणि नैसर्गिक रंगाचा वापर यावर भर देण्यात येणार आहे.
होळीत नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर जनजागृती करण्यात येते. त्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करुन प्रबोधन करण्यात येते. यावर्षीही जिल्ह्यातील शाळांमध्ये हे उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. जानेफळ येथील सरस्वती विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपक्रम राबवित्आहेत. नैसर्गिक रंग बनविण्यासाठी विद्यार्थी कामाला लागले आहेत.
उपलब्ध विविध प्रकारच्या फुलांपासून ओले व कोरडे रंग बनविले जाणार आहेत. परिसरातील कचरा जमा करुन कचऱ्याची होळी जाळणे, होळीत एरंडाचा वृक्ष न जाळता पर्यावरण बचावचा संदेश देण्यात येणार आहे.
बचतगटाची घेणार मदत
नैसर्गिक रंगांची विक्री करण्यासाठी बचतगटाची मदत घेण्यात येणार आहे. मागच्या वर्षी बचत गटाच्या नलिनी वानखेडे यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे सहा स्टॉल लावण्यात आले होते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्टॉलला भेट दिली होती. अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांनी स्टॉलवरुन नैसर्गिक रंग खरेदी केले होते.
असे बनवा नैसर्गिक रंग
नैसर्गिक रंगांपासून शरिराला कुठलेच अपाय होत नाहीत. पळसाच्या फुलापासून लाल रंग बनविण्यात बनविला जातो. हळदमध्ये अरारुट पावडर मिसळून पिवळा रंग तयार होतो. बीटपासून जांभळा रंग तर कडूलिंबाचा पाला व पालक एकत्र करुन हिरवा रंग मिळतो. नागरिकांनी नैसर्गिक रंग बनवून त्याचा वापर करावा.
पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी पाण्याची बचत करुन नैसर्गिक रंगाद्वारे होळी खेळावी. बचत गटाच्या स्टॉलवर नैसर्गिक रंग विक्रीस ठेवण्यात येणार आहे.
- संजय पार्डीकर
विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग बुलडाणा