भाऊबिजनिमित्त सुबोध सावजींची २०० बहिणींना ओवाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 06:58 PM2019-10-29T18:58:04+5:302019-10-29T18:58:10+5:30
२०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले.
अकोला : शांती,अहिंसा आणि स्वातंत्र्य चळवळीचे महत्वाचे स्थान असलेल्या या भूमित भाऊबीज ओवाळणी देतांना मला अतीव आनंद होत आहे. ही भेट आपण सर्व भगिनींनी आनंदाने स्विकारून मला आशीर्वाद द्यावा असे बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी संबोधित करताना म्हटले.
सेवाग्राम येथील नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये भाऊबीज ओवाळणी कार्यक्रमाचे आयोजन मुंबा देवी मंदिर देवस्थान मुंबई च्या व्यवस्थापण समितीच्या वतीने आणि माजी आमदार सुबोध सावजी यांच्या पुढाकाराने मंगळवारला घेण्यात आला.या प्रसंगी नयी तालिमचे डॉ. शिवचरण ठाकुर,गिरीश काशीकर, विठ्ठल तपासे,नामदेव ढोले,शोभा कवाडकर उपस्थित होते.मान्यवरांनी बापू,माँ - बाबा यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करण्यात आली.
सुबोध सावजी म्हणाले हा ऐकोनविसावा भाऊबीज चा कार्यक्रम आहे. मी दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला भगिनींना भेटवस्तू देत असतो.लोकांना दोन तीन बहिणी असतात पण मी भाग्यवान आहे या ठिकाणी दोनशे बहिणींना मी भाऊबीजेची ओवाळणी देणार आहे. या भेटीत साडी आणि ब्लँकेट असल्याचे सांगून हे सर्व मुंबईतील प्रसिद्ध मुंबा देविच्या चरणी अर्पण केलेल्या साड्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मी हे सर्व आपल्या आशीर्वादासाठी करीत असून अठरा कार्यक्रम आदीवासी आणि दुर्गम भागात केलेले आहे. यातून मला आनंद मिळतो हे या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करतो.
२०० महिलांना साडी,पातळ आणि ब्लँकेट वितरण करण्यात आले.यासाठी आश्रमचे मिथून हरडे, विजय धुमाळे,रूपाली ऊगले,नयी तालिम चे रूपेश कडू यांनी सहकार्य केले.