बिलांच्या जीएसटी नोंदणीअभावी किराणा बाजारातील आवक घसरली
By admin | Published: July 9, 2017 01:56 PM2017-07-09T13:56:27+5:302017-07-09T13:57:41+5:30
राज्य आणि राज्याबाहेरून येणारे किराणाचे साहित्य येण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजारपेठेत मंदी आली आहे.
अकोला: बिलांच्या जीएसटी नोंदणीअभावी अकोल्यातील किराणा बाजारातील वस्तूंची आवक घसरली आहे. वाशिम बायपास मार्गावरील न्यू किराणा बाजारात दररोज ५0 ते ६0 ट्रकची रीघ लागलेली असते. ही रीघ जुलैच्या एक तारखेपासून दिसेनासी झाली आहे. राज्य आणि राज्याबाहेरून येणारे किराणाचे साहित्य येण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजारपेठेत मंदी आली आहे. त्याचा अप्रत्यक्ष फटका आता सर्वसामान्य अकोलेकरांना बसतो आहे. जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसोबत व्यापारी आणि नागरिकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. जीएसटीच्या नवीन बिलांत सीजीएसटी आणि एसजीएसटीची नोंद करावी लागत आहे. अनेक कंपन्यांनी किराणा साहित्याची मागणी असूनही साहित्य पाठविलेले नाही. त्यामुळे अकोल्यातील वाशिम बायपास मार्गावरील किराणा बाजार थंडावला आहे. पूर्वीच्या तुलनेत रोज केवळ २0 ट्रक माल उतरविला जातो आहे. त्यामुळे अकोल्याच्या किराणा बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. जीएसटीच्या धोरणामुळे वाहतुकीचे चक्के जाम होत असल्याने किराणाच्या ठोक बाजारपेठेसह शहरातील चिल्लर दुकानदारांकडून लूट सुरू झाली आहे.