नवरदेवासह वऱ्हाडी म्हणाले, ‘ मतदान करणारच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:39 PM2019-03-29T12:39:30+5:302019-03-29T12:40:35+5:30
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभेची निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव झाला आहे.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभेची निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव झाला आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वीप’तर्फे रुस्तमाबाद येथील विवाह सोहळ्यातील वºहाडींकडून ‘मी मतदान करणारच’, असे अभिवचन घेण्यात आले.
बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथे गुरुवारी दिव्या दिनकर राऊत आणि अनिल पुंडलिक दाते यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये मतदानाप्रती जागरूकता व्हावी, यासाठी स्वीपचे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे, महिला आर्थिक विकास मंडळच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी मतदार साक्षरता अभियान राबविले. यासाठी त्यांनी थेट रुस्तमाबाद येथील लग्नमंडप गाठले. स्थानिक जय बजरंग शाळेच्या शिक्षिका पुष्पा गोल्डे आणि सावित्रीबाई फुले गाइड पथकाच्या सहकार्याने विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता केली.
‘स्वीप’च्यावतीने मतदानाचा अधिकार निर्भय वातावरणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी गाइड पथकाच्या मदतीने महिला आणि पुरुषांकडून मतदान करण्याचे लेखी अभिवचन घेण्यात आले. विवाह सोहळा असणाऱ्या दिव्या-अनिल, वर-वधूंचे वडील यांनीही मतदान करण्याविषयी लेखी अभिवचन दिले. विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे अभिवचन उत्साहाने भरून दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, नोडल अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात मतदारांमध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येत आहेत.