मैदाने पुन्हा गजबजली; खेळाडूंमध्ये उत्साह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:20+5:302021-06-24T04:14:20+5:30
रवी दामोदर अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे मैदानांवर शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, ...
रवी दामोदर
अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे मैदानांवर शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घसरल्याने अनलॉक प्रक्रियेत मैदाने, क्रीडा संकुल, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, जीम सुरू करण्यास परवानगी दिल्याने सद्य:स्थितीत ओस पडलेली मैदाने पुन्हा गजबजत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खेळांडूमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खेळाडूंना विविध स्तरांवरील स्पर्धा आयोजनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध आणि नियम लागू केले. याचा फटका जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला बसला. क्रीडांगणे, मैदाने यासह विविध खेळ, प्रशिक्षण केंद्रे बंद झाल्यामुळे खेळाडू व प्रशिक्षकांवर पुन्हा संकट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मैदाने खुली करण्यास परवानगी देण्यात आल्याने पुन्हा मैदाने गजबजून गेल्याचे चित्र आहे. (फोटो)
----------------------------------------
कोरोनाच्या संक्रमणामुळे खेळाडू मैदानापासून दुरावल्या गेला होता; परंतु आता मैदाने खेळाडूंनी फुलली आहेत. त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. निश्चितच अकोला जिल्ह्याला खेळामध्ये गतवैभव प्राप्त होईल.
-संजय मैंद,
सचिव, अकोला जिल्हा शारीरिक शिक्षक महामंडळ
--------------------------------------
पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थांसाठी सोयीचे झाले आहे. मैदाने खुली झाल्याने त्यांचा सराव पूर्ण होण्यास मदत होणार आहे. खेळाडूंमध्ये नवचैतन्य आले आहे.
-अजय वाहूरवाघ, फिटनेस कोच
---------------------------
पोलीस भरती, सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मैदानांवर शुकशुकाट होता. त्यामुळे खेळाडूंना फिटनेस टिकवण्याचे आव्हान होते. सद्य:स्थितीत मैदाने खुली झाल्याने पोलीस भरती, सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.