भूजल पातळी साडेपाच फुटांनी घटली
By admin | Published: June 16, 2016 02:20 AM2016-06-16T02:20:20+5:302016-06-16T02:20:20+5:30
अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट; भूजलाचा अतिरिक्त उपसा कारणीभूत.
अकोला: गत दोन-तीन वर्षांपासून होत असलेले अत्यल्प पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा तसेच जलपुनर्भरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटली आहे. यावर्षीही पावसाने दगा दिला, तर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळी तपासण्यासाठी तसेच या पातळीत वाढ व्हावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातील भूवैज्ञानिक दर तीन महिन्यांनी भूजल पातळीचे अवलोकन करतात. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ८१ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. गत मे महिन्यात या ८१ निरीक्षण विहिरींमधील जलपातळीचे अध्ययन करण्यात आले. गत पाच वर्षांंतील मे महिन्यातील सरासरीच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटल्याचे आढळून आले. तालुकानिहाय आकडेवारीवरून ही स्थिती अधिक स्पष्ट होते. अकोला तालुक्याची वर्ष २0११ ते २0१४ पर्यंतची सरासरी भूजल पातळी ९.९४ मीटर होती; परंतु वर्ष २0१६ मध्ये ती १0.८८ पर्यंंत खाली आली. याचा अर्थ भूजल पातळी १. १९ मीटरने घटली. आकोट तालुक्याची भूजल पातळी गत पाच वर्षांंच्या सरासरीच्या तुलनेत २.३३ मीटर, बाश्रीटाकळी तालुका २.२0 मीटर, बाळापूर 0.९६ मीटर, मूर्तिजापूर १.00 मीटर, पातूर १.६९ मीटर तसेच तेल्हारा तालुक्याची भूजल पातळी १.८१ मीटरने घटली आहे. जिल्ह्याची एकंदर भूजल पातळी सरासरी १.६0 मीटरने घटली आहे.