उपसा वाढला; भूजल पातळी दोन मीटरने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:28 PM2019-05-18T13:28:36+5:302019-05-18T13:29:00+5:30
अकोला : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
अकोला : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाळा होतो. या काळात झालेल्या पावसावर भूजल पातळी जानेवारी महिन्यापर्यंत स्थिर राहते; परंतु यावर्षी परतीचा पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील संपूर्ण दोन महिने कोरडे गेले. परिणामी, भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये टंचाईची स्थिती आणखी गंभीर झाली आहे.
पाणी जिरविण्याशिवाय गत्यंतर नाही!
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो, ते ५० ते १०० वर्षे अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरताना १०० फूट खोलानंतर एक फूट खाली जाण्यासाठी पाण्याला चार महिने (१२० दिवस) लागतात. यावरून जमिनीत पाणी खोल जाण्याची कल्पना येऊ शकते. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे, याचा विचार प्रत्येकाने केल्याशिवाय गत्यंतर नाही.
अशी आहे तालुकानिहाय घट
तेल्हारा तालुक्यामध्ये पाणी पातळीत तब्बल ३.०७ मीटरने घट झाली आहे. बाळापूर तालुक्यात २.५३, अकोटमध्ये ४.५९, पातूरमध्ये १.८६, मूर्तिजापूर मध्ये १.४४ तर अकोला तालुक्यामध्येही पाणी पातळीत मोठी घट आहे. या तालुक्यात ०.२२ मीटर पाणी पातळीत घट आहे.
८१ विहिरींचे केले निरीक्षण!
भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील भूजल पातळीची नोंद घेण्यासाठी एकूण ८१ विहिरींचे निरीक्षण केले.
मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार आता जिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, दोन मीटरने घट नोंदविली आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही तसेच मोठ्या प्रमाणात वाढलेला उपसाही कारणीभूत आहे. येणाऱ्या काळात जलपुर्नभरण करावे लागणार आहे.
- पी. पी. बर्डे, सहायक भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अकोला.