भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 03:22 PM2019-05-05T15:22:51+5:302019-05-05T15:23:22+5:30

घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे.

Ground water levels fall; irrigation farming become dry | भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

Next

- सत्यशील सावरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : दरवर्षी होत असलेले कमी पर्जन्य, हवामानातील ओझोन व प्रखर उष्णतेने पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे विघटन, घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ओलिताखालील जमीन निम्म्यावर येऊन जमिनीचा पोत बंजर होत असल्याचे विदारक चित्र ड्रायझोनची चाहूल देत आहे.
तालुका भौगोलिकदृष्ट्या चार भागात असून, कळासपट्टी सातपुडा पायथा, मध्यभाग, खारपाणपट्टा, दक्षिणेस नदी पठार भागात व्यापला आहे. यामध्ये लागवडीखालील ६५ हजार १२९ हे.आर., लागवडीलायक ५५ हजार ९११ हे.आर. जमीन आहे. यामध्ये ओलिताची व कोरडवाहू जमीन येते. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिकासाठी सुपिक असलेला हा तालुका वान लाभ क्षेत्रातील ओलीत व सिंचन विहीर, कूपनलिकाद्वारे ओलिताखाली होता. आजही वान हनुमान सागर धरण लाभ क्षेत्रात २५हजार २८ हे.आर. पैकी १९ हजार १७७ हे.आर. सिंचन अपेक्षित असते, हे पाणी रब्बी पिकाला मिळते. उर्वरित शेतजमिनीवर कळासपट्टी व मध्यभागात जास्त सिंचन होऊन फळबाग लागवड करण्यात येते. खारपाणपट्टा व दक्षिण भागात सिंचन कमी होते. तालुक्यातील ओलिताखालील जमीन ही कूपनलिकाद्वारे सिंचनाखाली आहे; परंतु दिवसेंदिवस पाण्याची भूजल पातळी तळाला जात आहे. आज रोजी कळासपट्टी व मध्यभागातील पातळी तीनशे फुटाच्यावर गेली असल्याने या भागातील उभ्या केळी, संत्रा झाडे, पान पिंपरी, भाजीपाला पिके धोक्यात आले आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी उभ्या बागा पाण्यामुळे तोडल्या आहेत. याच भागातील सातपुडा पर्वतरांगेतून तालुक्यातील नदीनाल्याचा उगम आहे; परंतु मुख्य नदी पूर्णा, आस, विदु्रपा, पोहरा, गौतमा या कमी पावसाने बंजर होत असल्याचे चित्र आहे. या नद्यांसह नाले पावसाळ्यातच कोरडे पडतात. त्यामुळे परिसरात ‘पाणी अडवा, जिरवा’ न होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. तालुक्यातील चारही बाजूंनी पाणी पातळीने तळ गाठला असल्याने ओलिताखालील क्षेत्रात घट होऊन जमीन कोरडवाहू होत आहे.

Web Title: Ground water levels fall; irrigation farming become dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.