मजूर मिळत नसल्याने भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:10+5:302021-05-01T04:17:10+5:30
सौंदळा : तेल्हारा तालुक्यातील सौंदळा परिसरात वारी, वारखेड, पिंपरखेड, कार्ला, सौंदळा या शिवारात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लागवड केली ...
सौंदळा : तेल्हारा तालुक्यातील सौंदळा परिसरात वारी, वारखेड, पिंपरखेड, कार्ला, सौंदळा या शिवारात यंदा मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लागवड केली आहे. सद्यस्थितीत भुईमुगाची लगबग सुरू आहे. परिसरात मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सौंदळा परिसरात यंदा भुईमुगाचे क्षेत्र वाढले असून, भुईमुगाचे पीक काढणीला आले आहे. दरवर्षी आदिवासी बांधव भुईमुगाची काढणीसाठी सौंदळा परिसरात दाखल होतात ; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर येत नाही. परिणामी परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी भुईमूग काढणीसाठी जादा मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड करण्यात येते. चार महिने परिश्रम घेतल्यानंतर भुईमूग काढणीला आल्यावर शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन, मूग, कपाशी, उडीद पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. यंदाही शेतकऱ्यांसमोर संकट उभे असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सद्यस्थितीत भुईमुगाच्या पिकाला ४ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे. उत्पादन घटल्याने भुईमुगाची शेती तोट्याची झाली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.
----------------------------
ढगाळ वातावरणाने वाढविली चिंता
जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस आल्यास पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
--------------------------
जादा मजुरी देऊनही मजूर मिळेना !
सौंदळा परिसरात भुईमूग काढणीची लगबग सुरू आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी घाई करीत असल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी जादा मजुरी देण्यास तयार आहेत. तरीही परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळण्यासाठी शेतकरी नातेवाईकांना फोन करून विचारणा करीत असल्याचे चित्र आहे.
------------------------