पिंपळखुटा परिसरात भुईमुगाच्या काढणीला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:30 AM2021-05-05T04:30:00+5:302021-05-05T04:30:00+5:30

पिंपळखुटा : येथून जवळ असलेल्या शिर्ला (नेमाने) येथील मन प्रकल्प व देऊळगाव (साकर्शा) येथील उतावळी प्रकल्प यंदा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ...

Groundnut harvesting begins in Pimpalkhuta area! | पिंपळखुटा परिसरात भुईमुगाच्या काढणीला सुरुवात!

पिंपळखुटा परिसरात भुईमुगाच्या काढणीला सुरुवात!

Next

पिंपळखुटा : येथून जवळ असलेल्या शिर्ला (नेमाने) येथील मन प्रकल्प व देऊळगाव (साकर्शा) येथील उतावळी प्रकल्प यंदा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरले आहेत. पाण्याची मुबलक सुविधा असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमूग पिकाची पेरणी केली. सद्य:स्थितीत भुईमुगाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मन प्रकल्प व उतावळी प्रकल्पावर यंदा जवळपास ४५० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी केली आहे. गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या काढणीला सुरुवात केली आहे. मात्र, परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिसरात बाहेरगावाहून मजूर बोलावून काढणीचे काम सुरू आहे. परिसरात सावरगाव, घाटनांद्रा, वसाली, झरंडी व लोखंडा, आदी गावांमधून मजूर दाखल झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असल्याने चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरू असून, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी बॅंकेत चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------------------------------------

ढगाळ वातावरणाने वाढविली चिंता

जिल्ह्यात गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची काढणी केली आहे, तर काही शेतकऱ्यांची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस आल्यास पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

--------------------------

जादा मजुरी देऊनही मजूर मिळेना !

पिंपळखुटा परिसरात भुईमूग काढणीची लगबग सुरू आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी घाई करीत असल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी जादा मजुरी देण्यास तयार आहेत. तरीही परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळण्यासाठी शेतकरी नातेवाइकांना फोन करून विचारणा करीत असल्याचे चित्र आहे. तसेच परिसरातील काही भागात सावरगाव, घाटनांद्रा, वसाली, झरंडी व लोखंडा गावांतील मजूर दाखल झाला आहे.

------------------------

Web Title: Groundnut harvesting begins in Pimpalkhuta area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.