भुईमुगाचे उत्पादन घटले; शेतकरी आर्थिक संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:31+5:302021-05-27T04:20:31+5:30
वाडेगाव : वाडेगाव परिसरातील तामसी, चिंचोली, देगाव, नकाशी, दिग्रस बु., दिग्रस खुर्द, हिंगणा, पिंपळगाव येथील शेतशिवारात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीस ...
वाडेगाव : वाडेगाव परिसरातील तामसी, चिंचोली, देगाव, नकाशी,
दिग्रस बु., दिग्रस खुर्द, हिंगणा, पिंपळगाव येथील शेतशिवारात उन्हाळी भुईमुगाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना लागलेल्या खर्चाइतकेही उत्पादन होत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
परिसरात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे विहिरींमध्ये पाणी मुबलक होते. तसेच परिसरातील नदी-नाल्यांना पूर गेल्यामुळे सिमेंट बंधारे, शेततळे तुडुंब भरून पाणी अडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे यंदा परिसरात उन्हाळी पिकांची पेरणी क्षेत्र वाढले. यामध्ये शेतकऱ्यांनी मूग, ज्वारी, मका व भुईमूग पिकाची पेरणी केली. सध्या भुईमुगाची काढणी सुरू आहे. भुईमुगावर बुरशीजन्य रोगाने आक्रमण केल्याने झाडाला केवळ दोन-चार शेंगाच लागल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात झाडांना ऐकही शेंग दिसून येत नाही. परिणामी, भुईमुगाच्या उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली आहे. (फोटो)
----------------------
केवळ गुरांचा चारा
भुईमूग पिकावर बुरशीजन्य रोगाचे आक्रमण झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या झाडाला शेंगाच नसल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी केवळ गुरांच्या चाऱ्यासाठी भुईमुगाची काढणी करीत असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
--------------------------
एका एकरात केवळ तीन कट्टे!
वाडेगाव परिसरातील तामसी, चिंचोली, देगाव, नकाशी शेतशिवारात एका एकरात भुईमुगाची पेरणी केली होती. शेतकऱ्यांना एका एकरात केवळ तीन कट्टे उत्पादन झाले आहे. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
-----------------------
यंदा भुईमूग पिकाची पेरणी केली. सद्य:स्थितीत भुईमूग पिकाला बुरशीजन्य रोगाने ग्रासले. पिकाला तीन-चार शेंगा असल्याने यावर्षी केलेला खर्चही निघणे कठीण दिसत आहे. शासनाने त्वरित भुईमूग पिकाचे सर्वेक्षण करून मदतीचा हात द्यावा.
- राहुल इंगळे, भुईमूग उत्पादक शेतकरी, हिंगणा