दोन वर्षांपासून गटविकास अधिकारी पदाचा भार प्रभारींवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:24 AM2021-08-25T04:24:17+5:302021-08-25T04:24:17+5:30
संतोषकुमार गवई पातूर : येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास ...
संतोषकुमार गवई
पातूर : येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याचा कारभार हा प्रभारींच्या खांद्यावर आहे. गटविकास अधिकाऱ्याचा पदभार हा विस्तार अधिकारी सांभाळत आहेत. दोन वर्षांपासून गटविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने तालुक्याचा विकास रखडल्याचे चित्र आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांची शासनाने नियुक्ती केली; मात्र ते अद्यापही रुजू झाले नाहीत.
राज्य शासनाच्या योजना राबविण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर असते. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे आहे. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद दि.१६ ऑगस्ट २०१९ पासून ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत रिक्त होते. पंचायत समितीचे कृषी अधिकारी विनोद शिंदे यांनी दि. १७ ऑगस्ट २०१९ ते दि.३१ ऑगस्ट २०२० प्रभारी पदभार सांभाळला. त्यानंतर अकोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी दि. १ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पदभार सांभाळला. त्यानंतर पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांनी दि.१ ऑक्टोबर २०२० आतापर्यंत काम पाहिले. लव्हाळे सुटीवर गेल्याने त्यांच्या जागेवर प्रभार घेण्यासाठी आलेले गाठेकरांना प्रभार न घेताच परत पाठविण्यात आले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तालुक्याच्या विकासासाठी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. शासनाच्या आदेशाने पातूर गटविकास अधिकारी या पदावर दि. १० ऑगस्ट रोजी राहुल शेळके यांची नियुक्ती केली असून, ते अकोला पंचायत समितीचे कार्यभार सोडल्यानंतर पातूरचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
240821\img_20210818_174956.jpg
पातूर पंचायत समिती