समूह साधन केंद्रावर होणार दरमहा शिक्षण परिषद
By admin | Published: September 2, 2016 12:49 AM2016-09-02T00:49:05+5:302016-09-02T00:49:05+5:30
राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला, दि. १: सर्व शिक्षा अभियानांतर्गत यापूर्वी गट संमेलनाचे आयोजन समूह साधन केंद्र स्तरावर आयोजित केले जात होते. यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत भारत सरकारने गट संमेलनासाठी निधी बंद केल्यानंतर गट संमेलनाचे आयोजन करणे बंद करण्यात आले होते. आता मात्र राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
गट संमेलनामध्ये केंद्रांतर्गत सर्व शिक्षक एकत्र येऊन शैक्षणिक आदर्श पाठाचे सादरीकरण शिक्षकांकडून करण्यात येत होते. विद्या प्राधिकरण पुणे यांच्याकडून गट संमेलनाचे आयोजन करण्याबाबतची कृती पुस्तिका व नियोजन सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करू न दिले होते. शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी गट संमेलन उपयुक्त ठरत होते; परंतु सर्व शिक्षा अभियान अंतर्गत भारत सरकारने गट संमेलनाचे आयोजन करणे बंद करण्यात आले होते. यानंतर राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करू न योग्य दिशेने शंभर टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने काम करणे सुरू झाले. यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुकापातळीवरील शिक्षण परिषद लाभदायी ठरल्या. यामध्ये प्रगत शाळा, डिजिटल शाळा, एबीएल शाळा, समाज सहभाग मिळविणार्या शाळा, आयएसओ ९00१ नामांकित शाळांमधील शिक्षक, केंद्राचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी सादरीकरण करतात. शंभर टक्के शाळा, केंद्र, बिट प्रगत करण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या प्रक्रिया, पद्धती, तंत्र व कौशल्य या बाबींचा सादरीकरणामध्ये समावेशअसतो. याचा उपयोग शिक्षण परिषदेमध्ये उपस्थित असणार्या संबंधितांना होतो.
याच धर्तीवर राज्यातील सर्व समूह साधन केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये १00 टक्के वर्ग, शाळा प्रगत करणार्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सादरीकरण आयोजित करावे लागणार आहे. तसेच संपूर्ण केंद्र शाळाबाह्य मूल विरहित करण्यासाठीचे नियोजन व उपाययोजना करण्यात येणार आहे. १00 टक्के मुलांची नियमित उपस्थिती, वाचन कार्यक्रम, स्वच्छता प्रक्रिया अहवालातील दर्शके (इन्डिकेटर्स) आदी बाबींचाही यामध्ये समावेश करावा लागणार आहे. केंद्रांतर्गत सर्व शाळा १00 टक्के प्रगत करण्यासाठीची चर्चा, नियोजन व कृती आराखडा या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून तयार करू न, त्याप्रमाणे प्रत्यक्ष उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरमहा समूह साधन केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचा अहवाल जिल्ह्याच्या प्रक्रिया अहवालामध्ये सादर करावा लागणार आहे.
-दरमहा शिक्षण परिषद होणे ही चांगली बाब आहे. यामध्ये ठरावीक विषय शिक्षकांनाच बोलावून त्यासंदर्भात चर्चा व्हायला पाहिजे. परिषदेच्या आयोजनादरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायला नको. याअंतर्गत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचादेखील गुणवत्ता विकास व्हायला पाहिजे.
-प्रभाकर रुमाले
राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त