बोरगाव मंजू परिसरात गुप्तधन शोधणारी टोळी
By admin | Published: June 16, 2016 02:17 AM2016-06-16T02:17:41+5:302016-06-16T02:17:41+5:30
पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला.
बोरगाव मंजू (अकोला) : बोरगाव मंजू परिसरातील नावखेड शिवारात गुप्तधन शोधणार्या टोळीचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेल्याची घटना १५ जूनच्या मध्यरात्री अडीच वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळावरू न पूजेचे साहित्य, लिंबू आणि खोदकामाचे साहित्य जप्त केले असून, आरोपी फरार झालेत. या परिसरात गुप्तधन असल्याची माहिती मिळाल्यानंतर या क्षेत्रातील जाणकार असलेल्या सहा जणांनी नावखेड शिवाराकडे आपला मोर्चा वळविला. रात्री अडीच वाजता अंधारात आरोपी खोदकामाचे साहित्य घेऊन जंगलात गेल्याची बातमी बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. यानंतर तात्काळ ठाणेदार भास्कर तवर, हेकॉ निमकंडे, अनिल गोपनारायण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात कोणी तरी येत असल्याचे आरोपींच्या लक्षात येताच त्यांनी येथून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यातील आरोपींची नावे पोलिसांना मिळाली आहे. आरोपींमध्ये फिरोज खान मनवर खान, रा. मजलापूर यांचासह सहा जणांचा समावेश आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम कलम २ (ख), ३ (१)(३) नूसार गुन्हा दाखल केला. या घटनेत वापरण्यात आलेल्या चारही दुचाकी पोलिसांना जप्त केल्या असून त्याची किंमत १ लाख ८६ हजार आहे. यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.