फुप्फुसांमध्ये वाढतोय कफ; चिमुकल्यांसह ज्येष्ठांमध्ये न्यूमोनियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:46+5:302021-09-16T04:24:46+5:30
अकोला : सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापेच्या रुग्णांची संख्या वाढली असून अनेकांना सर्दी, खोकल्याचीही लक्षणे आहेत. सर्दीमुळे फुप्फुसांमध्ये कफ दाटण्याचे ...
अकोला : सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापेच्या रुग्णांची संख्या वाढली असून अनेकांना सर्दी, खोकल्याचीही लक्षणे आहेत. सर्दीमुळे फुप्फुसांमध्ये कफ दाटण्याचे प्रमाण वाढल्याने चिमुकल्यांसह वयोवृद्धांना न्यूमोनियाचा धोका वाढला आहे. कोविडची स्थिती नियंत्रणात असली, तरी व्हायरलच्या तापेने अनेकांची डोकेदुखी वाढवली आहे. डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या जास्त असून, रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्याचीही लक्षणे आहेत. सर्दी जास्त दिवस राहिल्याने फुप्फुसांमध्ये कफ वाढल्याने न्यूमोनियाचा धोका वाढला आहे. सद्य:स्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या जास्त असून, यामध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. वातावरणातील बदल आणि रस्त्यावरील धुळीमुळे अस्थमा आणि सीओपीडीच्या रुग्णांना या दिवसांमध्ये न्यूमोनियाचा सर्वाधिक धाेका संभवतो. त्यामुळे अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.
यांना आहे सर्वाधिक धोका
ज्येष्ठ नागरिकांसोबतच चिमुकल्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते.
त्यामुळे अशांना न्यूमोनियाचा धोका जास्त असतो.
तसेच अस्थमा आणि सीओपीडीच्या रुग्णांनाही न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते.
पोस्ट कोविडमध्ये फायब्रोसिसची समस्या असणाऱ्यांनाही न्यूमोनियाचा धोका जास्त असतो.
यांनी घ्यावी न्यूमोनियाची लस
पाच वर्षांपेक्षा लहान बालकांना न्यूमोनियाची लस द्यावी
६४ वर्षांवरील शुगर, रक्तदाब, दमा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी ॲन्टीबायोटिक्स
सर्दी, खोकला झाला की, अनेकजण औषध विक्रेता देईल ती औषधी घेऊन मोकळे होतात.
त्यामुळे दुसऱ्यांदा आजारी पडल्यास ॲन्टीबायोटिक्स परिणामकारक ठरत नाही.
त्याचा विपरीत परिणाम लिव्हर आणि किडनीवर पडण्याची शक्यता असते.
त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ॲन्टीबायोटिक्स घ्यावी.
लोकांमध्ये कोविडची भीती
व्हायरल फीवर, सर्दी, खोकला आणि तापेच्या लक्षणांमुळे अनेकांमध्ये कोविडची भीती देखील पसरल्याचे दिसून येते. असे रुग्ण कोविडची चाचणी करतात. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह येत असल्याने ते आजाराकडे दुर्लक्ष करतात. परिणामी सर्दी वाढून फुप्फुसांमध्ये कफ दाटण्याचे प्रमाणही वाढत आहे.
सद्य:स्थितीत व्हायरल इन्फेक्शनची साथ सुरू आहे. त्यामुळे सर्दी, खाेकल्याचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये कफ दाटून न्यूमोनिया होण्याचा धोका असतो. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ॲन्टीबायोटिक्स घ्यावी.
- डॉ. सागर थोटे, छातीरोग तज्ज्ञ, अकोला