वाढत्या तापमानाचा भुईमुगाला फटका!
By admin | Published: April 10, 2017 01:27 AM2017-04-10T01:27:51+5:302017-04-10T01:27:51+5:30
संकट : महान परिसरात पाण्याची पातळी गेली खोल, कांद्याचे पीक सुकले
महान : दिवसेंदिवस वाढत असलेला तापमानाचा महान परिसरातील भुईमूग पिकाला फटका बसत आहे. पिके सुकली असून, पाण्याचा वापरही वाढला आहे. एकीकडे पाण्याची पातळी कमी झालेली असताना पाण्याची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट वाढले आहे.
महान व परिसरात यावर्षी शेकडो एकर जमिनीत शेतकऱ्यांनी भुईमूग पिकास पसंती देऊन पेरणी केली आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भुईमूग लागवड व पेरणीस एक महिना उशिराने झाली असल्याने सध्याच्या परिस्थितीत भुईमुगाचे पीक फुलावरच आहे. भुईमूग पिकास आठवड्यातून किमान एक दिवस निश्चित करून शेतकरीवर्ग पाणी द्यायचे; परंतु दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असल्याने भुईमुगाचे पीक सुकत आहे, तर कांद्याचे पीक पिवळे पडत असून, शेतकरी संकटात पडला आहे. भुईमूग पिकांवर भर उन्हात मावा नामक रोगाने ग्रासले आहे.
भुईमूग पिकांची परिस्थिती बघता भुईमुगास तिसऱ्याच दिवशी पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ भरपूर पाणी आहे, त्यांना चिंता नाही; परंतु ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला कमी प्रमाणात पाणी आहे, त्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीतच महान परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी खूप प्रमाणात कमी झाल्याने विहिरी उपशावर आल्या आहेत. या नवीन संकटामुळे तोंडातला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे, तसेच महान व परिसरात यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली असून, कांद्यावरसुद्धा उष्ण तापमानाचा फटका बसत असून, कांद्याचे पीक पिवळे पडत असून, माना टाकत आहे.
उत्पादन घटण्याची शक्यता
४भुईमूग व कांदा या दोन्ही रब्बी पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. उष्ण तापमानाचा फटका वरील दोन्ही पिकांना बसून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिके तयार होण्यास एक ते दीड महिन्याचे अंतर बाकी आहे. ऐनवेळेवर विहिरीचे पाणी कमी होणार, याची थोडीफारही कल्पना शेतकऱ्यांना नव्हती. अगोदरच शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून लागवड व पेरणी केली.त्यानंतर निंदण, डवरे, भरी, युरिया देऊन आवश्यक त्या वेळेस कीटकनाशकाची फवारणी केली.
गेल्यावर्षीही बसला होता फटका
मागच्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नसून, शेतकऱ्यांना लावलेला खर्चही काढता आला नाही. त्या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले कर्जही फेडता आले नाही. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून यावर्षी भुईमूग पिकास प्राधान्य दिले. उष्ण तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.