नवीन प्रभागात टप्प्याटप्प्याने करवाढ
By admin | Published: April 4, 2017 01:38 AM2017-04-04T01:38:15+5:302017-04-04T01:38:15+5:30
मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या प्रभागात प्रत्येक वर्षी २० टक्क्यांची टप्प्याटप्प्याने करवाढ केली जाईल.
अकोला : मनपा क्षेत्रात नव्याने सामील झालेल्या प्रभागात कोणतीही करवाढ लागू नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. संबंधित मालमत्ताधारकांना प्रत्येक वर्षी २० टक्क्यांची करवाढ केली जाईल. ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपंचायतींचा कर जमा केला नसेल त्यांना मनपाच्या नियमानुसार कर लागू केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
मनपाने मालमत्तांचे निवासी, वाणिज्य, औद्योगिक असे वर्गीकरण केले आहे.
निवासी वापरासाठी यापूर्वी १५० रुपये प्रति चौरस मीटरचे दर होते. सुधारित कर प्रणालीनुसार त्यामध्ये १२० रुपये म्हणजेच ८० टक्के वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक मालमत्तेला २७० रुपये प्रति चौरस मीटरचे दर लागू झाले. वाणिज्य वापरासाठी यापूर्वी २४० रुपये प्रति चौरस मीटरची दर आकारणी होती. त्यामध्ये १२५ टक्क्यांनी वाढ करीत ५४० रुपये प्रति चौरस मीटर लागू करण्यात आले. औद्योगिक वापरासाठी ४०५ रुपये प्रति चौरस मीटर दर लागू आहेत.
सेना, काँग्रेस, भारिपचा विरोध
शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी संपूर्ण शहराचा सर्व्हे करून अहवाल सादर करा त्यानंतरच दरवाढ लागू करण्याचे मत मांडले. काँग्रेसचे गटनेता साजीद खान, भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड.धनश्री देव यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध असल्याचे नमुद केले.