‘जीएसटी’मध्ये वहिखात्यांचा नीट सांभाळ आवश्यक
By admin | Published: September 20, 2016 01:33 AM2016-09-20T01:33:22+5:302016-09-20T01:33:22+5:30
विदर्भ चेंबरमध्ये पार पडलेल्या ‘जीएसटी’वरील कार्यशाळेत बी.सी. भरतिया यांचे प्रतिपादन.
अकोला, दि. १९- देशातील सर्वात मोठी कर सुधारणा जीएसटी कायद्याने होत आहे. त्याचे सर्व व्यापार्यांनी स्वागत करावे.जीएसटी प्रणाली व्यापार्यांसाठी चांगली आहे. मात्र त्यासाठी व्यवहारातील दैनंदिन वहिखात्यांचा नीट सांभाळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केले. विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या कार्यालयात सोमवारी झालेल्या जीएसटी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
एकत्रित करामुळे व्यापारी उद्योजकांना दिलासा मिळणार असला तरी, यासाठी व्यापार्यांनी देखील आपली मानसिकता तयार ठेवणे गरजेचे आहे. जीएसटीबाबत अत्यंत प्राथमिक माहिती भरतीया यांनी दिली. येत्या १ एप्रिल २0१७ पासून जीएसटी लागू होत असून, याची संपूर्ण माहिती व्यापारी आणि उद्योजकांनी ठेवली पाहिजे.
वकील आणि सीए यांच्या सल्ल्यानुसार व्यापार्यांनी वहीखाते तयार ठेवले पाहिजेत. कोणत्या व्यापार्यांसाठी जीएसटी प्रभावशाली आणि कोणासाठी तोट्याची ठरणार, याची माहितीही त्यांनी येथे दिली. दीड तासांच्या कार्यशाळेतील मार्गदर्शनानंतर भरतीया यांनी अर्धा तास व्यापार्यांच्या उपस्थित प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले. त्यानंतर अकोल्यातील एका बँकेच्या अधिकार्यांनी ऑनलाइन व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबरचे अध्यक्ष विजय पनपालिया होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेश गुप्ता यांनी केले, तर आभार विवेक डालमिया यांनी मानले. विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसचे पदाधिकारी आणि शेकडो व्यापारी या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते. जीएसटीसंदर्भात चेंबरने वेळोवेळी अशा कार्यशाळा आयोजित करून व्यापार्यांना मार्गदर्शन करावेत, असे आवाहनही त्यांनी येथे केले.