जीएसटी; न्यू किराणा बाजारातील व्यवसायावर परिणाम
By admin | Published: July 5, 2017 01:23 AM2017-07-05T01:23:42+5:302017-07-05T01:23:42+5:30
दररोज येणाऱ्या ५० ट्रकऐवजी येत आहेत केवळ २० ट्रक माल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसोबत व्यापाऱ्यांमध्ये अनेक संभ्रमही निर्माण झाले आहेत. जीएसटीच्या नवीन बिलांतून उत्पादन शुल्क आणि सेवा कर वगळल्या जाणार असल्याचे सनदी लेखापाल सांगत असले तरी ते नेमके कोणत्या उत्पादनावर आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी राज्य आणि राज्याबाहेरून येणाऱ्या विविध उत्पादनाच्या मालाची मागणी केली असली तरी,जीएसटीच्या नवीन बिलातील वाहतूक भाड्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
त्यामुळे वाहतूक व्यावसायिकांनी माल वाहतूक थांबविली आहे. त्याचा परिणाम अकोल्यातील न्यू किराणा बाजारावर पडला आहे. दररोज अकोला किराणा बाजारात विविध उत्पादनाचा सरासरी ५० ट्रक माल दररोज उतरतो. मालाची मागणी असूनही वाहतूक भाड्याबाबत संभ्रम असल्याने जुलै महिन्यात दररोज केवळ २० ट्रक माल उतरविला जातो आहे. त्यामुळे अकोल्याच्या किराणा बाजारावर चांगलाच परिणाम झाला आहे. जीएसटीच्या धोरणामुळे वाहतुकीचे चक्के जाम होत असल्याने बाजारपेठेत वस्तूंची कृत्रिम भाववाढ होण्याची शक्यता आहे.
वाहतूक भाड्यातील संभ्रमामुळे चार दिवसांपासून अकोल्यातील व्यापार मंदावला आहे. बाहेरून माल आल्याशिवाय ही रक्कम कुणाला द्यायची आहे, हे स्पष्ट होईल. जीएसटीतील त्रुटी दूर करण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे.
- कासम अली,
अकोला होलसेल मर्चंट सचिव, अकोला