पालकमंत्र्यांनी घेतले पहाडसिंगी गाव दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 02:16 AM2015-12-29T02:16:47+5:302015-12-29T02:16:47+5:30
गावक-यांनी केला पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात गावाचा विकास करण्याचा संकल्प.
खेट्री (जि. अकोला): अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पातूर तालुक्यातील पहाडसिंगी हे डोंगरदर्यांमध्ये वसलेले आदिवासी गाव दत्तक घेतले आहे. या बाबीची घोषणा पालकमंत्र्यांनी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी गावाला दिलेल्या भेटीदरम्यान गावकर्यांच्या आयोजित सभेत दिली. यावेळी गावकर्यांनी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात गावाचा विकास करण्याचा संकल्प केला. पहाडसिंगी हे गाव डोंगरदर्यांमध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेले असले तरी या गावाचा आजपर्यंंत फारसा विकास झालेला नाही. या गावाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संध्याकाळी ७ वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी गावात अगदी गल्लीबोळात फिरून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. या गावात मुख्य समस्या पाणी, रस्ते, विद्युत पुरवठा या स्वरूपाच्या आहेत. गावातून फिरून आल्यानंतर पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांची सभा घेतली. या सभेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिकराव आखरे, पातूर तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते रमण जैन, पातूर पंचायत समितीचे सभापती लोखंडे, पहाडसिंगीचे सरपंच सदाशिव चव्हाण, श्रीकांत बराटे, पातूर तालुका शिवसेनाप्रमुख रवींद्र मुर्तडकर, परमानंद श्रीराम, प्रवीण देशपांडे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी राम लठाड, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे, पातूरचे गटविकास अधिकारी मुरकुटे, कनिष्ठ अभियंता चितारे, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मोरे, कृषी अधिकारी मकासरे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.