माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दुर्गासाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले वडील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 07:39 PM2022-06-13T19:39:57+5:302022-06-13T19:41:47+5:30

Guardian Minister Bachchu kadu : पुरोहितांनी सांगितले त्याप्रमाणे विधिवत पूजा करून जावई प्रवीण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करून दुर्गा ही कन्या जावई प्रवीण यांच्या सुपूर्द केली.

Guardian Minister Bachchu kadu became father for Durga who lost the umbrella of parents | माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दुर्गासाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले वडील

माता-पित्याचे छत्र हरविलेल्या दुर्गासाठी पालकमंत्री बच्चू कडू झाले वडील

googlenewsNext
ठळक मुद्देकन्यादान करून पार पाडली जबाबदारी पित्याच्या मायेने केला जावई आणि लेक यांना आहेर

अकोला : मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हा बापाच्या आयुष्यातील कसोटीचा प्रसंग म्हणून नेहमीच वर्णिला जातो. नियतीने ज्या मुलींचे पितृछत्र हिरावून घेतले, त्या मुली ही वेदना अधिक जाणू शकतात. आज अशाच एका हळव्या प्रसंगात पालकमंत्री बच्चू कडू पाहावयास मिळाले. एरवी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे पालकमंत्री याठिकाणी खूपच हळवे आणि भावूक भासत होते. मुलीचे लग्न आणि तिचे कन्यादान हे प्रसंग मुलीच्या बापाच्या जीवनात कसोटीचे असतात, ते यासाठीच!

बाळापूर तालुक्यातील दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे आणि आई प्रमिला या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. माता-पित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात, असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते.

तिचे मेहुणे व मामा यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू केले. कंचनपूर (ता. खामगाव, जि. बुलडाणा)चे विलासराव बहुरूपी यांचे चिरंजीव प्रवीण यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्न समारंभ करून देण्याचा प्रश्न आला. व्याळ्याजवळच हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यावतीने करून देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न पार पडले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधूपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितले त्याप्रमाणे विधिवत पूजा करून जावई प्रवीण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करून दुर्गा ही कन्या जावई प्रवीण यांच्या सुपूर्द केली. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. पित्याच्या मायेने जावई आणि लेक यांना आहेर केला. शुभाशीर्वाद देऊन मगच पालकमंत्री सोहळ्यातून बाहेर पडले.

या विवाह सोहळ्यासाठी मुरलीधर राऊत, अमोल जमोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे ही सेवाभावी मंडळी घरचे कार्य असल्याप्रमाणे सगळं हवं नको ते पाहात होते.

Web Title: Guardian Minister Bachchu kadu became father for Durga who lost the umbrella of parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.