लेखा विभागाकडून पालकमंत्री, प्रभारी आयुक्तांची दिशाभूल
By admin | Published: January 28, 2015 12:43 AM2015-01-28T00:43:02+5:302015-01-28T00:43:02+5:30
पदाधिका-यांकडून संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न; अकोला मनपा कर्मचारी संतप्त, आंदोलन चिघळणार.
आशिष गावंडे / अकोला : महापालिका तिजोरीत जमा असलेल्या पैशांतून कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्यासाठी काही अधिकारी-पदाधिकार्यांचे हात शिवशिवत असल्याने लेखा विभागाकडून प्रभारी आयुक्तांसह चक्क पालकमंत्र्यांची जमा रकमेच्या मुद्दय़ावरून दिशाभूल केली जात आहे. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची बदली होताच अधिकार्यांनी तब्बल ३0 टक्क्यांच्या बदल्यात थकीत देयके अदा करण्याचे ह्यकमिटमेंटह्ण कंत्राटदारांसोबत केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सहा महिन्यांच्या थकीत वेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न विचारत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा पाचवा दिवस उजाडला तरी तोडगा निघण्याचे कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन होईल एवढा पैसा मनपाच्या तिजोरीत उपलब्ध असताना तो देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. यामध्ये खुद्द लेखा विभागाकडूनच प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांना जमा रकमेबद्दल चुकीची माहिती दिली जात असल्याचे समोर आले आहे. २३ जानेवारी रोजी दिवेकर यांना मनपाकडे केवळ १४ कोटी रुपये जमा असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार दिवेकर यांनी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भूमिक ा स्पष्ट केली. सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी स्वीकारताच त्यांनी जमा रकमेबद्दल सविस्तर माहिती घेतली असता, अवघ्या चार दिवसांतच त्यामध्ये सात कोटींची भर पडली. मनपाने न्यायालयीन लढा देऊन जकातीचे ३ कोटी ५0 लक्ष रुपये प्राप्त झाले असले तरी ही माहितीच वरिष्ठ अधिकार्यांपासून दडवून ठेवण्यात आली. डॉ. कल्याणकर यांची बदली होताच बांधकाम विभाग, जलप्रदाय विभाग व लेखा विभागातील अधिकार्यांनी काही पदाधिकार्यांसोबत हातमिळवणी करीत मनपा निधीतून कोट्यवधींची देयके अदा करण्याचा घाट घातला आहे. संघर्ष समिती वेतनाच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहून संघटनेत फूट पाडण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. सफाई कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याच्या बदल्यात ते आंदोलनातून माघार घेतील, असा प्रस्ताव काही मनपा पदाधिकार्यांनी सोमवारी समितीसमोर ठेवला. हा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले,अनूप खरारे यांनी साफ फेटाळला. या प्रकाराची माहिती मिळताच मनपा कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे