पालकमंत्र्यांनी केली डवरणी; बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 02:16 PM2018-07-01T14:16:51+5:302018-07-01T14:22:15+5:30
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या.
अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या. त्यामध्ये डोंगरगाव येथील एका शेतात पालकमंत्र्यांनी डवरणीही केली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ मोहीम ३० जूनपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा येथे भेट देली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये डोंगरगाव येथील मधुकर महादेव देवकर यांच्या शेतात डवरणी सुरू असताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डवरणीही केली. यावेळी शेतकरी मधुकर महादेव देवकर, श्रीकृष्ण नामदेव देवकर तसेच शेतमजूर नंदू भटकर यांच्याशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी अडचणी समजून घेतल्या. डोंगरगाव येथे शेतात विद्युत खांब वाकले असून, तार तुटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांनी वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांसोबत संंपर्क साधून विद्युत खांब दुरुस्तीचे निर्देश दिले. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याची मागणी शेतमजुरांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका - शेतकऱ्यांची मागणी!
डोंगरगाव व सिसा-मासा येथे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात येत असल्याची समस्या शेतकऱ्यांनी पालमंत्र्यांसमोर मांडत, पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा न करता बचत खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्यां विविध योजनांची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांसोबत केले भोजन!
डोंगरगाव येथे एका शेतात डवरणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतात शेतकऱ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांसोबत भोजन करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कृषी विद्यापीठातील शेततळे, वाशिंबा येथील उद्यानाची पाहणी!
शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेततळ्यांमध्ये उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याची पाहणी केली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वाशिंबा येथील उद्यानालाही भेट देऊन पाहणी केली.