सुपर स्पेशालिटीच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा!
By admin | Published: June 30, 2017 01:03 AM2017-06-30T01:03:25+5:302017-06-30T01:03:25+5:30
सर्वोपचारमध्ये लवकरच ‘एमआरआय’ : रुग्णांचीही केली विचारपूस
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला येथे प्रस्तावित असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाचा गुरुवारी दुपारी आढावा घेतला. यावेळी सर्वोपचार रुग्णालयात लवकरच ‘एमआरआय’ सुविधा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अकोला येथे प्रस्तावित असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री डॉ. पाटील यांनी अभियंते व या हॉस्पिटलचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा केली. कामाचा दर्जा उत्तम राहील, निर्धारित वेळेत काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्वोपचार ते सुपर स्पेशालिटी यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही निकालात काढण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी सर्वोपचार रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन आढावा घेतला. रुग्णांची विचारपूस करीत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याची सूचना तेथील डॉक्टरांना केली.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा सामान्य रुग्णांना लाभ मिळाला पाहिजे, याची दक्षता घेण्यात यावी. या कामामध्ये कोणी हयगय केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.