डॉक्टर पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:17 PM2018-08-07T13:17:16+5:302018-08-07T13:19:28+5:30
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयास भेट देऊन, रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाचा अभाव आदी कारणांमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या पृष्ठभूमिवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सकाळी रुग्णालयास भेट देऊन, रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासोबतच त्यांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
डॉक्टर असलेले पालकमंत्री यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयास भेट देऊन विविध विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नेत्र चिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, चर्मरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग विभाग, दंतरोग चिकित्सा, बाह्यरुग्ण विभाग, मुखपूर्व कर्करोग उपचार केंद्र कान-नाक-घसा विभाग आदी विभागाला भेट दिली. तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बालरोग चिकित्सा विभागात उपचारासाठी असलेल्या लहान मुलांना योग्य उपचार व औषध देण्याबाबत तिथे उपस्थित असलेल्या नर्सिंग स्टाफला डॉ. रणजित पाटील यांनी सूचना दिल्या. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर बांधकाम चालू असलेल्या श्रोतृगृह (आॅडीटोरियम) भेट देऊन त्वरित बांधकाम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम शिरसाम,वैद्यकीय उप-अधीक्षक डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, चंद्र्रकांत चन्ने आदी उपस्थित होते.
प्रशासकीय व आरोग्य सेवेचा आढावा
तत्पूर्वी, डॉ. रणजित पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या कक्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय तसेच रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत आढावा घेतला. शवविच्छेदन विभागातील शीतगृह, रुग्णालयात निर्माण होणाºया जैव कचºयाची विल्हेवाट आदी विषयांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांबाबतची माहिती घेतली. पॅथॉलॉजी, रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, विविध शस्त्रक्रिया, रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, एमआरआय, औषधांचा साठा, रुग्णवाहिका आदींची सूक्ष्म माहिती डॉ. पाटील यांनी घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.
विद्युतविषयक कामे मार्गी लावण्याच्या सूचना
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया विद्युत विभागातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्युतविषयक कामांत दिरंगाई होत असल्याची तक्रार अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते यांनी केली. यावेळी पालकमंत्री यांनी त्वरित दूरध्वनीवरून संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करून कामात कुचराई न करण्याबाबत त्यांची कानउघाडणी केली.