पालकमंत्र्यांनी घेतली शहीद कुटुंबीयांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:59 PM2021-01-04T17:59:43+5:302021-01-04T18:00:07+5:30
Bacchu Kadu News बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेतल्या व आस्थेवाईकपणे चौकशी केली.
अकाेला : देशासाठी सीमेवर रक्षणाचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांची साेमवारी ज पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेतल्या व आस्थेवाईकपणे चौकशी केली. पालकमंत्र्यांच्या या सहृद भेटीने शहिदांचे कुटुंबीय गहिवरले. शहिदांच्या माता पितांना वंदन करण्यासाठी तसेच त्यांना काही अडीअडचणी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या भेटीसाठी आलो, अशी भावना यावेळी ना. कडू यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी अकोला शहर व परिसरात राहत असलेल्या भारतीय सैन्यात कर्तव्य बजावतांना वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेतल्या. त्यात शिवनी येथील शहीद प्रशांत प्रल्हाद राऊत, यशवंत नगर वाशीम बायपास येथील संतोष खुशाल जामनिक, पंचशिलनगर येथील आनंद शत्रुघ्न गवई, तर डाबकी रोड येथील सुमेध वामन गवई यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.
या सर्व कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदत व अन्य मदतींबाबत चौकशी केली. प्रत्यक्ष पालकमंत्रीच आणि तेही थेट घरी भेटण्यासाठी आलेले पाहून कुटुंबीय आश्वस्त दिसून आले. त्यांच्यापैकी काहींना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करून त्या दूर करण्याबाबत त्यांनी तात्काळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
आज ज्यांच्या कुटुंबीयांना भेटी दिल्या त्यापैकी शहीद प्रशांत प्रल्हाद राऊत मु. पो. शिवनी हे दि.२३ मार्च २००७ रोजी शहीद झाले होते. शहीद संतोष खुशाल जामनिक २७ जुलै १९९१ रोजी, शहीद आनंद शत्रुघ्न गवई हे दि. २६ जानेवारी २०१७ रोजी, शहीद सुमेध वामन गवई हे दि. १२ ऑगस्ट २०१७ रोजी शहीद झाले होते.
या सर्व शहीद कुटुंबीयांना जर काही अडचणी असतील तर त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सोडवाव्यात, असे निर्देशही यावेळी ना. कडू यांनी दिले.