पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ९५ तक्रारी प्राप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:21 PM2019-06-11T13:21:22+5:302019-06-11T13:22:29+5:30
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या.
अकोला : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेतलेल्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचा पंधरा दिवसांत निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींची चौकशी करून पंधरा दिवसांच्या आत तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याचा दिलासाही पालकमंत्र्यांनी तक्रारकर्त्यांना दिला. मागील जनता दरबारात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी काय कार्यवाही केली, यासंदर्भात चौकशी करून पालकमंत्र्यांनी विभागनिहाय आढावा घेतला. तसेच जनता दबारात प्राप्त विविध विभागांसंबंधी नवीन तक्रारींचा पंधरा दिवसांत निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, रमेश पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बोंडअळीच्या मदतीपासून वंचित शेतकºयांची तक्रार!
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी मदतीच्या लाभापासून वंचित असल्याची तक्रार बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील अजित पारसकर, राजेश पारसकर यांच्यासह ४२ शेतकºयांनी जनता दरबारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. शेतकºयांच्या या तक्रारीचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना दिले.
गावात दारूबंदी करा; पिंजर महिलांची मागणी!
पिंजर वडगाव या गावात गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याने, गावातील पुरुष वर्ग दारूच्या आहारी गेला आहे. त्यामुळे गावात दारूबंदी करण्याची मागणी पिंजर वडगाव येथील महिलांनी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुषंगाने यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या.
विभागनिहाय अशा प्राप्त झाल्या तक्रारी!
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये महसूल विभाग-२८, पोलीस विभाग-१०, जिल्हा परिषद -१२, महानगरपालिका-१४, विद्युत विभाग-८, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-२, भूमी अभिलेख विभाग-४, कृषी विभाग-२, जिल्हा अग्रणी बँक-८, वन विभाग-१, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-२, सार्वजनिक बांधकाम विभाग-२, मत्स्य विभाग-१ व इतर १ अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.