सूर्योदय महिला गृह उद्योगास पालकमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:52+5:302021-01-08T04:55:52+5:30
या वेळी उद्योगाच्या मुख्य प्रवर्तक दीपिका देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडू यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा अग्रणी बँकेचे ...
या वेळी उद्योगाच्या मुख्य प्रवर्तक दीपिका देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडू यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया उपस्थित होते. या उद्योगातील सहभागी महिला भागीदारांनी मिळून सर्व उत्पादनांची माहिती दिली. या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश कडू यांनी दिले.
केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करा - बच्चू कडू
अकोला : शहरातील उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्या. तसेच त्यांना नास्ता, जेवण, वैद्यकीय सोईसुविधा व रोजगार निर्मिती करण्याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मनपाला दिले. शहरातील निवारा केंद्राला भेटी दरम्यान कडू बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या व बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करून द्यावा तसेच त्यांना निर्वाह भत्ता लागू करावा. केंद्रातील व्यक्तींना त्यांच्या शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा. केंद्रातील व्यक्तींना वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार व मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.
व्यायामशाळेचा टॅक्स कमी करा!
अकाेला : काेराेना महामारीमुळे नऊ महिन्यांपासून व्यायामशाळा बंद आहेत. बहुतांश व्यायामशाळांना शासनाचे अनुदान मिळत नाही. ही बाब लक्षात घेता यंदा मालमत्ता कर विभागाने कमी कराची आकारणी करावी, अशा आशयाचे निवेदन माजी उपमहापाैर निखिलेश दिवेकर यांनी महापाैर अर्चना मसने यांना दिले आहे.
रस्त्यांची कामे संथ गतीने
अकाेला : शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांचे निर्माण कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे अकाेलेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे.
रुग्णांच्या देयकांचे ‘ऑडिट’ रखडले
अकाेला : काेराेना विषाणूच्या कालावधीत शहरातील खासगी काेविड रुग्णालयांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने देयके आकारली. या बाबीचा ऊहापाेह झाल्यानंतर खासगी रुग्णालयांच्या देयकांचे ‘ऑडिट’ करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला हाेता. ही प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.
तुरीवर अळींचा प्रादुर्भाव
अकाेला : मागील काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याचा परिणाम शेत पिकांवर झाला असून, तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीने हल्लाबाेल केल्यामुळे शेतकऱ्यांसमाेर संकट उभे ठाकले आहे.
काेराेनाबाबत जनजागृती
अकाेला : थंडीच्या दिवसांमध्ये काेराेना विषाणूचा प्रसार अधिक गतीने होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून काेराेनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक घराबाहेर फिरताना ताेंडाला रूमाल किंवा मास्क बांधत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
असदगड किल्ल्याची दुरवस्था
अकाेला : शहरात इतिहासाची एकमेव साक्ष देणाऱ्या असदगड किल्ल्याची देखभाल- दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षी किल्ल्याची पडझड थांबावी या उद्देशातून संरक्षक भिंत उभारण्यात आली हाेती.
गांधी चाैकाला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला : शहरातील प्रमुख बाजारपेठ वसलेल्या गांधी चाैकाला लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर रेडिमेड ड्रेस, प्लास्टीकची खेळणी व किरकाेळ साहित्याची विक्री केली जात असून, अतिक्रमणाची समस्या दूर करणाऱ्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने झाेपेचे साेंग घेतले आहे.
जनता बाजारात अवैध हरासी
अकाेला : जनता भाजी बाजारच्या जागेवर महापालिका प्रशासनाकडून व्यावसायिक संकुलाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासनाने भाजी बाजारातील हरासी व दैनंदिन व्यवसायावर निर्बंध आणले आहेत. असे असतानाही काही भाजी व्यावसायिकांनी जनता भाजी बाजारात अवैधरीत्या हरासी सुरू केल्याचे चित्र आहे.
ऑटोचालकांची मनमानी; वाहतूक पोलीस हतबल
अकोला : वाहतूक शाखा पाेलिसांच्या डाेळ्यांदेखत गांधी रोड, सिटी काेतवाली चाैक तसेच खुले नाट्यगृह चाैकात ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना चौकात ऑटाे उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या वाहतूक पोलीस दूर करतील का, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
पंचायत समितीसमाेर खड्डे
अकाेला : शहरातील पंचायत समिती कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात आले. परंतु पशुवैद्यकीय दवाखाना ते मनपाच्या वाणिज्य संकुलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती न करता काम बंद करण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.