अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
By admin | Published: December 4, 2014 12:38 AM2014-12-04T00:38:51+5:302014-12-04T00:38:51+5:30
शासनाचा पुढाकार: अभियांत्रिकी व राज्य दुय्यम न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्याचा निर्णय.
खामगाव (बुलडाणा): महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी ७ टक्के आरक्षण आहे; मात्र गत काही वर्षांपासून अनुसूचित जमातीचे उमेदवार अन्य प्रवर्गाच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्या अभियांत्रिकी व राज्य दुय्यम न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने भरण्यात येणार्या अभियांत्रिकी पदांसाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना देण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य न्यायिक दुय्यम सेवेतील पदांकरीता बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
*प्रबोधिनीचा प्रशिक्षण कालावधी दोन महिन्यांचा
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ आणि गट-ब करीता पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील आयोगास अर्ज पाठविणार्या उमेदवारांची माहिती जलसंपदा व आदिवासी विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे या संस्थेमार्फत उमेदवारांची पूर्वचाळणी/चाचणी परीक्षा घेण्यात येईल. पूर्वचाळणी परीक्षेमध्ये निवड झालेल्या कमाल ६0 उमेदवारांनाच आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांची मुलाखतीसाठीची सर्वंकष तयारी प्रशिक्षण संस्थेकडून करून घेण्यात येईल.