शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्याविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:48+5:302020-12-06T04:19:48+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचा मानस व्यक्त केला. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचा मानस व्यक्त केला. त्याचाच आधार घेत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी कंबर कसली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळ कृषी अधिकारी अकोट यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका या शासनाच्या कार्यक्रमाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ प्रशांत सरप यांनी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य या प्रकल्पात होणाऱ्या कामकाजाविषयी संबोधित केले. जमीन ही कशी सजीव आहे, शेतकऱ्यांनी दिलेले खत झाडांना किती प्रमाणात उपलब्ध होते. त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये जसे की गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त व लोह यांची अकोला जिल्ह्यातील जमिनीत किती प्रमाणात कमतरता आहे. याविषयी शेतकरी बांधवांना सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. संदीप हाडोळे मार्गदर्शन केले. सूक्ष्म अन्नद्रव्ये ही जमिनीत किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात, हे सुद्धा प्रात्यक्षिक स्वरुपात समजावून सांगितले. यावेळी संबोधताना डॉ. हाडोळे यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच जमिनीच्या आरोग्याच्या महत्त्वाबाबत सखोल माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम दिनोडा व वडगाव मेंढे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सर्व शेतकरी व शास्त्रज्ञांचे आभार मानले.