अकोल्याच्या बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगीचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:01 PM2019-01-15T13:01:43+5:302019-01-15T13:01:53+5:30
अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली.
अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली.
मकर संक्रांत हा सण महिलांचा सण असला, तरी पतंगोत्सवामुळे पुरुषांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. त्याअनुषंगानेच संक्रांतीच्या १५ दिवासांआधीच शहरात पतंगाची बाजारपेठ सज्ज झाली. यंदा मात्र बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. शहरातील तेलीपुरा परिसरातील पतंग बाजारपेठेत विविध रंगांच्या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत आहेत. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली. सायंकाळपर्यंतच शहरात लाखो रुपयांची उलाढाल पतंग बाजारपेठेत झाली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा पतंग प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
स्थानिक उत्पादन घटले
यावर्षी शहरातील पतंग उद्योगांमार्फत पतंग उत्पादन घटल्याची माहिती पतंग व्यावसायिकांनी दिली. पतंगांची वाढती मागणी आणि ग्राहकांची पसंती पाहता गुजरात आणि मध्यप्रदेशातून पतंग आणि मांजांची मागणी करण्यात आल्याचेही पतंग विक्रेत्यांनी सांगितले.
चायना मांजाची छुप्या मार्गाने विक्री
चायना मांजावर बंदी असली, तरी पतंगप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा मांजा छुप्या मार्गाने विक्री होत आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
मांजापासून राहा सावध
चायना मांजाला पर्याय म्हणून बाजारपेठेत धातूचे आवरण असलेला मांजा दाखल झाला आहे. हा मांजा साधा वाटत असला, तरी पक्ष्यांसोतच वाहनधारकांसाठी धोकादायकच आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी वाहन चालवताना या मांजापासून सावध राहा.