राज्याच्या तिळाच्या बाजारपेठेवर गुजरातची संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:42 PM2019-01-14T12:42:24+5:302019-01-14T12:42:44+5:30
अकोला: महाराष्ट्राच्या तिळाच्या बाजारपेठेत स्थानिक तीळ कमी आणि गुजरातचा तीळ जास्त दिसून येत असून, राज्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हक्काची स्थानिक बाजारपेठ गमाविली आहे.
- संजय खांडेकर
अकोला: महाराष्ट्राच्या तिळाच्या बाजारपेठेत स्थानिक तीळ कमी आणि गुजरातचा तीळ जास्त दिसून येत असून, राज्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हक्काची स्थानिक बाजारपेठ गमाविली आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ, मराठवाडा, आणि खान्देशच्या काही पट्ट्यातून कधीकाळी राज्यभरात तीळ पोहोचत असे. एवढे तीळ उत्पादक शेतकरी या पट्ट्यात होते. कालांतराने तिळाचा पेरा कमी झाला; मात्र तिळाची मागणी अजूनही आहे तशीच आहे. तेलाची मागणी कमी झाली असली तरी भाजी मसाला, तीळपट्टी आणि संक्रांतीसाठी अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तिळाची मागणी कायम आहे. पेºयाअभावी बाजारपेठेतील स्थानिक तीळ दिसेनासा होताच महाराष्ट्रातील तिळाची बाजारपेठ उत्तर प्रदेश आणि गुजरातने काबीज केली आहे. पांढरे आणि स्वच्छ आकर्षित पॅकिंगची तीळ गुजरातने बाजारात आणल्याने राज्यातील ग्राहकांनी स्थानिक तीळ नाकारणे सुरू केले. गुजरातच्या तिळास पसंती मिळू लागल्याने गुजरातचे एक नव्हे विविध कंपन्यांचे सहाही ब्रॅण्ड महाराष्ट्रात तेजीत आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक तीळ उत्पादक शेतकºयांना आता भाव नाही. महाराष्ट्रातील उपरोक्त परिसरातील तिळास १२० ते १४० प्रतीकिलो रुपये भाव मिळत आहे. त्या तुलनेत मात्र गुजरातच्या तिळास १६५ प्रतिकिलो भाव आहे. गुळगुळीत आकर्षक पॅकिंग आणि पांढरा शुभ्र तीळ असल्याने ग्राहक गुजरातचा तीळ निवडत आहे. त्या तुलनेत चविष्ट असलेल्या राज्यातील नैसर्गिक तिळास दुय्यम दर्जा मिळतो आहे. राज्याच्या तिळाच्या बाजारपेठेवर अप्रत्यक्षरीत्या गुजरातने संक्रात आणली आहे. राज्यातील तीळ उत्पादक शेतकºयांनी तीळमूल्य आणि बाजारपेठ दोन्ही गमाविल्याची जाणीव आता होत आहे.
अकोल्यासारख्या ठिकाणी दहा कोटीची उलाढाल
प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर ते जानेवारीपर्यंत, संक्रांतीच्या निमित्ताने तिळास विशेष मागणी असते. या दरम्यान दररोज एक ट्रक अकोल्याच्या ठोक बाजारपेठेत उतरतो. एका ट्रकची किंमत १६ लाख होते. त्या आकडेवारीनुसार अकोल्यात केवळ दोन महिन्यात दहा कोटीची उलाढाल होते. या व्यतिरिक्त वर्षभर तीळ आणि तीळ तेलाची मागणी वेगळी असते.
स्थानिक तीळ उत्पादक शेतकºयांचा तीळ काळा-पांढरा मिक्स असतो. त्यामुळे त्याला कमी भाव मिळत आहे. अलीकडे प्रत्येक ग्राहकास पॅकिंग आणि स्वच्छ तीळ हवा असतो. त्यामुळे गुजरातचा तीळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विक्री होत आहे.
- सुशील पोतदार, ग्रेन मर्चंड, अकोला.