रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ‘गुरू’
By admin | Published: July 19, 2016 01:55 AM2016-07-19T01:55:18+5:302016-07-19T01:55:18+5:30
जागृतीचा कष्टकरी मुलांसाठीचा जागर; रात्र शाळांमध्ये ‘जागृती’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
अकोला : विद्यार्थ्यांंचा शोध घेणे, त्यांच्या पालकांना समजावून सांगत शाळेत पाठवा, असा आग्रह धरणे, शाळेत आलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे देतानाच माणूस म्हणून घडविण्याचे संस्कार करणे, सकाळची शाळा करून रात्री या सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे, या सर्व गोष्टी वाचल्यावर कुणालाही जुन्या काळातील एखाद्या शिक्षकाची आठवण येणे साहजिकच आहे. आताच्या काळात असे होत नाही, असा शेराही मारून आपण मोकळे होऊ. पण, अकोल्यात हे घडत आहे. गेल्या तीस वर्षांंपासून विनायक देशमुख नावाचे हाडाचे शिक्षक हे कार्य ह्यजागृती नाईट स्कूलह्णच्या माध्यमातून करीत आहेत. ही शाळा म्हणजे भरकटण्याच्या मार्गावर असलेल्या, परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागणार्या शेकडो विद्यार्थ्यांंसाठी नवा आशेचा किरण ठरला असून, विनायक देशमुख हे या रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ह्यगुरूह्ण ठरले आहेत.
राज्यात दोनशे रात्र शाळा असून, त्यामध्ये १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या सर्व शाळांमध्ये ह्यजागृतीह्णचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १९८७ साली या शाळेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.
गरीब, हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबामध्ये मुलांना शिकविण्याची ऐपत नसते, त्याला कामाला पाठवले तर तेवढाच संसाराला हातभार या हेतूने आई-बाप सुद्धा मुलांच्या शिक्षणापेक्षा उत्पन्नाला महत्त्व देतात. त्यामुळे शिक्षणाची इच्छा व बुद्धिमत्ता असलेल्या अनेकांना शिक्षणाची वाट सोडून द्यावी लागते. ही बाब हेरून विनायक देशमुख यांनी अशा मुलांचा शोध घेतला, त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले, पालकांना समजावले, मुलांना हवे तर काम करू द्या, पण रात्री शाळेत पाठवा, असा पर्याय दिला. मुले तयार होतीच पालकांनी होकार दिला अन् जागृतीचा जागर सुरू झाला तो आजतागायत.
अकोल्यातील झोपडपट्टी, गावातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थायिक झालेले कुटुंब यांचा शोध घेत विनायकरावांनी जमविलेल्या विद्यार्थ्यांंना पैलू पाडत त्यांच्यामधून हिरे घडविले. घरातील कलह व गरिबी या दोन्ही गोष्टींमुळे अनेक मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळली होती. या मुलांना चांगले वळण लावीत शिक्षणाच्या मार्गावर आणण्याचे काम देशमुखांनी केले. आज या मधील अनेक मुले चांगल्या हुद्यावर नोकरीला आहेत, कुणाचा व्यवसाय सुरू आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती तर कधीची संपली आहे. कुठलीही फी न घेता सुरू असलेल्या ज्ञानयज्ञामध्ये समाजाचाही मोठा हातभार लागल्याचे विनायकराव प्रांजळपणे सांगतात.
सध्याही सकाळी शाळेत नोकरी केल्यावर जागृती नाईट स्कूलचे मुख्याध्यापक पद तेवढय़ाच आत्मीयतेने सांभाळत आहेत. शासनाने कलचाचणी आता सुरू केली, पण या शाळेतील मुलगा दहावी झाला, की त्याने कोणता मार्ग धरावा याचा कल सुरुवातीपासून सांगितला जातो. प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल हा ८0 टक्क्याच्या वर अन् गुणवत्ता यादी असताना गुणवत्ता यादीत स्थान हा शाळेचा लौकिक विनायकरावांनी जपलेल्या ह्यगुरूपणह्ण या वैशिष्ट्यामुळे कायम राहिला आहे.