अकोल्यात ४० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 10:44 AM2022-06-04T10:44:09+5:302022-06-04T10:44:18+5:30

Gutka worth Rs 40 lakh seized in Akola : राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजाराजवळच्या गोदामावर छापा घालून तब्ब्ल ४० लाखांच्यावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला.

Gutka worth Rs 40 lakh seized in Akola | अकोल्यात ४० लाखांचा गुटखा जप्त

अकोल्यात ४० लाखांचा गुटखा जप्त

Next

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जुने शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजाराजवळच्या गोदामावर छापा घालून तब्ब्ल ४० लाखांच्यावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. हा गुटख्याचा साठा शहरातील मोठ्या गुटखा माफियाचा असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात रात्री १२ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सोळाचाकी वाहनासह दोन चारचाकी वाहने आणि चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

राज्यात बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बिझनेस सेंटर येथे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याची माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाली. मीणा यांच्या पथकाचे प्रमुख अजित देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावरील बिझनेस सेंटर येथे छापा घालून गुटख्याची पोती जप्त केली. या दरम्यान बिझनेस सेंटरवरील तीन-चार आरोपी घटनास्थळाहून वाहने सोडून पसार झाले. जप्त करण्यात आलेला गुटखा जवळपास ४० लाख रुपयांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हा गुटख्याचा साठा कोणाचा आहे, त्याचा मालक कोण याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

त्या गुटखामाफियावर कारवाईची हिंमत दाखवाल का?

लवकरच या गुटख्याचा मालक कोण? हे समोर येण्याची अपेक्षा आहे. अकोल्यात गुटखा माफिया म्हणून कोण काम करतो हे अकोलेकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या गुटखा माफियांवर अकोला पोलीस कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे.

स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

विशेष पोलीस निरीक्षक चंद्रकिशाेर मीणा हे यापूर्वी अकोल्यात एसपी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचेही अकोल्यात खबरी आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा सुटीवर असताना, त्यांच्या पथकाने छापा घालून अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक आणि पोलीस ठाण्यांमधील डीबी स्क्वॉड कार्यरत असताना, पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला अकोल्यात येऊन कारवाई करावी लागत असल्यामुळे अकोल्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सांशकता निर्माण झाली आहे.

Web Title: Gutka worth Rs 40 lakh seized in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.