गुटख्याचा साठा जप्त, दोन आरोपींना अटक
By admin | Published: June 28, 2016 07:02 PM2016-06-28T19:02:33+5:302016-06-28T19:53:57+5:30
गुलजारपुरा येथे एका वाहनात सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा साठा नेण्यात येत असताना डाबकी रोड पोलिसांनी जप्त केला.
अकोला - डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलजारपुरा येथे एका वाहनात सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा साठा नेण्यात येत असताना डाबकी रोड पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा घालून हा गुटखा साठा जप्त केला. सदरचे वाहन जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुलजारपुरा येथील रहिवासी तसेच व्यापारी चेतन गुप्ता यांच्या घराजवळ एम एच ३५ ई ११३१ क्रमांकाच्या बोलेरो चारचाकी वाहनामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाली. यावरून डाबकी रोड पोलिसांनी गुप्ता यांच्या घराजवळील चारचाकी वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल, नजर, तंबाखू व पानमसाल्यासह गुटख्याचा साठा आढळला. यावेळी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे सुनील साखळकर व सुभाष गुप्ता या दोघांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. डाबकी रोड पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. एम. कोलते आणि अन्न निरीक्षक नितीन नवलकार यांच्या ताब्यात दिला असून, त्यांनी गुटखा जप्तीची कारवाई सुरू केली होती. शहरासह जिल्ह्यात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना पोलिसांकडून मात्र थातुर-मातूर कारवाई करण्यात येत आहे. गत १५ दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतही जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने ४० लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा गुलजारपुरा येथून दोन लाखांचा गुटखा साठा जप्त केला. पोलीस कारवाई सुरू असतानाही गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच असल्याने गुटखामाफीया पोलिसांवर शिरजोर असल्याचे दिसून येत आहे.
*गुटख्याची छुप्या मार्गाने वाहतूक
गुटख्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केल्या असल्या, तरी रात्रीच्या अंधारात गुटख्याची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुटखा माफीयांवर पोलिसांकडून वारंवार कारवाईची गरज असून, त्यानंतर गुटखा माफीयांचे कंबरडे मोडल्या जाणार आहेत. ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्यानंतरही गुटखा माफीया काहीही न समजता पुन्हा या धंद्यात जोरात उतरत असल्याचे आजपर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे पाणप्यांसह सर्वच गुटखा माफीयांवर वारंवार कारवाईची गरज निर्माण झाली आहे.