‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान शाळांमध्ये राबविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:31 AM2018-01-02T01:31:41+5:302018-01-02T01:34:13+5:30
अकोला : शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राज्यातील ४0८ तालुक्यांमधील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राज्यातील ४0८ तालुक्यांमधील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांनी शिक्षणाधिकार्यांना पाठविला आहे. या आराखड्यानुसार शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
इंग्रजी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा, जिल्हा परिषद शाळांना लागलेली विद्यार्थ्यांची गळती पाहता, शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान सुरू केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांविषयी आकर्षण वाढले असून, आपली मुले-मुली दर्जेदार इंग्रजी शाळांमध्ये शिकविण्यासाठी पालक धडपड करताना दिसून येतात. त्यातही जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. सोबतच गरीब परिस्थितीमुळे अनेक मुलींना शिक्षण अध्र्यावर सोडावे लागते. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या कमी होऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील ४0८ तालुके व शहरांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे, त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थिनी शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, म्हणून शासनाने विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यासोबतच सायकल भेट, मोफत पाठय़पुस्तके, गणवेशासाठी अनुदानसारख्या योजना सुरू केल्या आहेत. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा, अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींना या सर्व योजनांचा लाभ देण्यात येऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शाळा निश्चित करून त्या शाळांमध्ये लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील ४३४ शाळांमध्ये उपक्रम
राज्यातील शाळांसोबतच जिल्हय़ातील ४३४ शाळांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. ३ ते २६ जानेवारीदरम्यान प्रभात फेरी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, जीवन चरित्र, बालिका दिनाची प्रतिज्ञा, एकांकिका सादरीकरण, शाळाबाहय़ मुले, मुलींची यादी जाहीर करणे, माता मेळावा व खेळ, बालिका दिन प्रतिज्ञा, कृतज्ञता मेळावा, लेक वाचवा, लेक शिकवा विषयावर रांगोळी प्रदर्शन, माजी विद्यार्थी गौरव, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती, दिव्यांग यशस्वी उद्योजक, नोकरदाराची मुलाखत, शाळाबाहय़ मुला-मुलींच्या पालक भेटी, पथनाट्याद्वारे जनजागृती, स्थलांतरीत पालकांच्या मुलींना शाळेत दाखल करणे यांसह विविध उपक्रम होणार आहेत.
कन्यारत्न असलेल्या माता-पित्यांचा सन्मान होणार
एक किंवा दोन कन्या अपत्यांवर थांबलेल्या माता-पित्यांचा शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर सन्मान होणार आहे, तसेच नाते मैत्रीचे, मायलेकीचे हा माता मेळावा होणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची होणारी कमी संख्या पाहता, शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. विद्या प्राधिकरणाने दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
- प्रकाश मुकुंद,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक.