गारठा वाढला!
By admin | Published: December 25, 2015 03:10 AM2015-12-25T03:10:59+5:302015-12-25T03:10:59+5:30
विदर्भाच्या तापमानात चढ-उतार.
अकोला: राज्यात मागील चोवीस तासांत सकाळी ८.३0 वाजेपर्यंत नाशिक येथे सर्वात कमी ६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील तापमानात मात्र चढ-उतार सुरू आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी दिवसा थंड हवामान होते. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात तर कोकणच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या तापमानात चढ-उतार सुरू असून, मागील चोवीस तासांत अकोला येथे किमान तापमान १0.९ होते. अमरावती आणि बुलडाणा १३.0, यवतमाळ १२.४ अंश, नागपूर १३.४, गोदिंया १२.२, ब्रह्मपुरी ११.0 तर वर्धा येथे १५.0 किमान तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी डिसेंबर महिना आला तरी नैसर्गिक थंडी गायब आहे. मागील पंधरवड्यात उत्तरेकडील थंड हवेच्या प्रभावाने विदर्भात किमान तापमानात अल्पशी घट झाली होती. आता पुन्हा अशाच पद्धतीने गारवा वाढला असून, रात्रीच्या तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकांना स्वेटर, लोकरचे कपडे बाहेर काढावे लागले आहेत.