विदर्भात मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:03 PM2020-01-06T14:03:43+5:302020-01-06T14:03:48+5:30
पुन्हा आता ७, ८ व ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे
अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली असताना पुन्हा आता ७, ८ व ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, धुके वाढले असून, विदर्भात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळत आहे.
गत चोवीस तासांत रविवार, ५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनते लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. सध्या आकाश निरभ्र असूूून, किमान तापमानात घट झाली असली जरी पुन्हा विदर्भात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
७ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा पुणे हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ९ जानेवारी रोजीही विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गत चोवीस तासांत विदर्भातील अकोल्याचे किमान तापमान १०.२ अंशावर खाली आले आहे. हे किमान तापमान १७.० अंशावर पोहोचले होते. वाशिम १२.०, बुलडाणा १०.२, अमरावती १२.२, यवतमाळ १४.०, वर्धा १२.६, नागपूर १२.०, तर गोंदियाचे किमान तापमान १०.२ अंश होते.